मुंबई -आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव अर्ज दाखल केला ( Anil Deshmukh Application For Treatment ) आहे. आपल्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यावर न्यायालय आज मंगळवार रोजी निकाल देणार होते मात्र आता पुन्हा न्यायालयाकडून 13 मे रोजी निकाल देण्यात येईल असे सांगण्यात आले ( Decision on Anil Deshmukh Treatment ) आहे.
2 नोव्हेंबर रोजी झाली होती अटक - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर 12 तास चौकशी केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. त्यांनंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. त्यात आपल्या दुखऱ्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र सरकारी जे.जे. रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील अपुऱ्या सुविधामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाकडे स्वत बाजू मांडताना केली होती.