मुंबई - ज्येष्ठ नागरिक व विविध आजार असलेल्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचे तसेच त्यात त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या ११ दिवसात ६० वर्षांवरील तब्बल ३१८ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या नातेवाईकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक व दीर्घकालीन आजार असणाऱ्या नागरिकांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ७ ते १७ सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये ३१८ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. या कालावधीत ४० ते ६० वयोगटातील ११९ जणांचा मृत्यू झाला. यात दीर्घकालीन आजार असलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईत १७ सप्टेंबरला कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू झाला. यात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या २८ होती. तर ४० ते ६० वयोगटातील १३ व दोन जणांचे वय ४० वर्षाखालील होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बाहेरील होणारा संपर्क जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.