मुंबई-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग त्यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणात ठाण्याला दाखल झालेल्या प्रकरणातील सह आरोपी डीसीपी पराग मनेरे ( DCP Parag Manere ) यांना तत्कालीन ठाकरे सरकारने निलंबित केले होते. नव्याने आलेल्या शिंदे सरकारने पुन्हा त्यांना सेवेत घेतले आहे. एकीकडे ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करत असताना त्या काळातील अनेक निलंबित अधिकाऱ्यांनादेखील पुन्हा सेवेत शिंदे सरकार रुजू करून घेत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये होणार ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिक पाहाला मिळण्याची शक्यता आहे.
DCP Parag Manere : एकनाथ शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, डीसीपी पराग मनेरे पुन्हा सेवेत - Eknath Shinde Govt
डीसीपी पराग मनेरे यांना एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे.
परमबीरर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यावेळी त्यांनी काही व्यवसायिकांकडून खंडणी मागितले असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित केले होते. मात्र आता शिंदे सरकारने त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस अधीक्षक पदावर केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह डीसीपी पराग मणेरे, बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन, मनोज घाटकर आणि इतर तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण-परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये यूएलसी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याने केल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुनील आणि संजय यांना आणखी एका खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती.