मुंबई -सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून आणण्याचा घेतलेल्या निर्णयावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर टीका केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2014 साली राज्यातील भाजप सरकारने सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा संपूर्ण राज्यभर पहायला मिळाला. देशात अन्य राज्यातही थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडले जातात. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची थेट जनतेतून निवड ( Direct Elections Sarpanch And Mayor ) होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पैशाची खेळी करता येत नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला ( DCM Devendra Fadnavis Criticized Congress Ncp ) आहे.
'महापौर जनतेतून निवडून आणण्याच विचार नाही' -राज्य मंत्रिंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार असताना थेट जनतेतून निवडून येण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2019 ला सत्ता पालट झाल्यानंतर तात्कालीन सरकारने हा निर्णय फिरवला. त्यामुळेच सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही राज्यात महापौर देखील जनतेतून निवडले जातात. पण, सध्या महाराष्ट्र सरकारचा महापौर जनतेतून निवडून आणण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिले.
'विरोधकांची लाईन डेड, म्हणूनच त्यांना डेडलाईन हवी' - राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 14 दिवस उलटले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर सातत्याने विरोधकांकडून केली जाणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चिमटा काढला. "विरोधकांची लाईन डेड, म्हणूनच त्यांना डेडलाईन हवी", असा टोला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांना लगावला आहे. तर, तिथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मात्र, सध्या मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला, तरी राज्यांचे कोणतेही काम थांबलेलं नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.