मुंबई- सहकार विभागाकडून मुंबई(मुंबै) बँकेला देण्यात आलेल्या नोटीस संदर्भात मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही कारवाई राजकीय सुडातून झाल्याचा आरोप केला होता. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियंत्रणात असलेल्या सहकार संस्था आणि बँकेतले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा थेट इशाराच राष्ट्रवादीला दिला होता. तसेच पुणे सहकारी बँकेचे संदर्भात आपल्याकडे पुरावे असून लवकरच आपण याबाबत पुरावे समोर आणणार असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेतून सांगितले होते. दरेकर यांंच्या या आरोपाला आणि इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
अजित पवारांचे दरेकरांना प्रत्युत्तर तपास यंत्रणेकडे त्याबाबतची तक्रार करावी-
कोणाला एखाद्या संस्थेबाबत संशय असल्यास त्यांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणेकडे त्याबाबतची तक्रार करावी. त्यांच्या तक्रारीत काही तथ्य असल्यास तपास यंत्रणेला दिलेल्या तक्रारी नुसार तपास यंत्रणा चौकशी करतील, आणि त्यातून खरे काय ते निष्पन्न होईल, असे आव्हान अजित पवार यांनी प्रत्युत्तरादाखल दरेकरांच्या इशाऱ्यावर दिले आहे. आज(गुरुवारी) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी प्रवीण दरेकर यांना हे आव्हान दिले आहे.
काय आहे प्रकरण-
प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याचा चौकशी अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र बँकेच्या चौकशीचे आदेश हे केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी दिले असल्यााच आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई (मुंबै) जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या बँकेचे घोटाळे बाहेर काढणार-
आर्थिक संस्थेबाबत राजकारण करणे हे चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये बँकेबाबत विरोधाभास दर्शवणाऱ्या बातम्या आल्यास त्याचा आर्थिक फटका बँका आणि सहकारी संस्थांना बसत असतो. त्यामुळे बँका किंवा सहकारी संस्था बाबत राजकारण करणे चुकीच आहे. मात्र मुंबै बँकेवर सुरू असलेल्या सुडाचे राजकारण पाहता आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियंत्रणात असलेल्या सहकारी बँका आणि सहकारी संस्थेचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराच त्यांनाी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
डिसेंबर अखेर होणार सैन्यभरती, एमपीएसी परीक्षाचाही निर्णय लवकरच - अजित पवार
येत्या डिसेंबर आखेरपर्यंत सैन्यभरती होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोल्हापूर मध्ये डिसेंबरमध्ये सैन्यभरती होणार असून त्या भरती संबंधीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा संदर्भातील वेगवेगळ्या विभागातील नेमकी किती पदक रिक्त आहेत, यासंबंधीचा अहवाल सर्व खात्याकडून 30सप्टेंबर पर्यंत मागवण्यात आला असून, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास रिक्त पदांची सर्व माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात येईल, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - राजकीय हेतूने मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश, आता राष्ट्रवादीशी संबंधित बँकांचे घोटाळे बाहेर काढणार - दरेकर
हेही वाचा - मुंबै बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल तीन महिन्यात सादर करा; सहकार विभागाने काढले आदेश