मुंबई -हृदयावरील सर्वात महत्वाची शस्त्रक्रिया म्हणून बायपास सर्जरी ओळखली जाते. हृदयात जाणारा रक्तपुरवठा नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यास अडकते. रक्त हृदयात जाण्यास अडथळे येतात. कमी ब्लॉकेज असल्यास ऍन्जोप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. तर जास्त ब्लॉकेज असल्यास बायपास ऑपरेशन करावे लागते. ऑपरेशन वेळेवर न झाल्यास हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा थांबल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नागरिक रुग्णालयात धाव घेतात. डॉक्टरांनी आपल्या रुग्णावर उपचार करून त्याला दुसरे जीवन द्यावे अशी अपेक्षा नातेवाईकांना असते.
ऑपरेशनसाठी तारीख पे तारीख - बायपास शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे काही रुग्ण मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात बायपास सर्जरीसाठी दाखल झाले आहेत. नायर रुग्णालयात आपल्यावर वेळेवर उपचार होतील आणि आपल्याला नवे जीवन मिळेल अशी अपेक्षा रुग्ण आणि नातेवाईकांची आहे. मात्र, नायर रुग्णालयात सीव्हीटीएस या वॉर्डमध्ये केवळ ४० बेड्स आहेत. या वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुमारे २०० रुग्णांची प्रतीक्षा यादी आहे. यामुळे रुग्णांना बायपास ऑपरेशन करण्यासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. या रुग्णांवर दिलेल्या तारखेला ऑपरेशन होईल याची शाश्वती डॉक्टरांकडून दिली जात नाही. तारखांना येऊन बेड्स खाली आहे का हे विचारून बघा असे सांगून नातेवाईकांना परत पाठवले जाते. यामुळे आपल्या रुग्णाचे ऑपरेशन होणार कि नाही याची भीती नातेवाईकाना सतावत आहे.