मुंबई : मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क लावावे तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्य सरकार आणि महापालिकेकडून केले जात आहे. जे नागरिक मास्क लावत नाहीत त्यांच्यावर पालिकेकडून दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. गेल्या ५४८ दिवसांत ३४ लाख ८४ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ७१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही मुंबईत दिवसाला विनामास्क फिरणाऱ्या ९ ते १० हजार नागरिकांवर रोजच दंडात्मक कारवाई होत आहे. यामुळे कोरोनाबाबतच्या नियमांकडे आणि आवाहनाकडे मुंबईकर दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत दररोज फिरतात ९ हजारहून अधिक विनामास्क नागरिक!
मुंबईत दिवसाला विनामास्क फिरणाऱ्या ९ ते १० हजार नागरिकांवर रोजच दंडात्मक कारवाई होत आहे. यामुळे कोरोनाबाबतच्या नियमांकडे आणि आवाहनाकडे मुंबईकर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
३४ लाख ८४ हजार नागरिकांवर कारवाई
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ५४८ दिवसांत ३४ लाख ८४ हजार ०८४ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत ७१ कोटी ३४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने २८ लाख ७५ हजार १४२ नागरिकांवर कारवाई करत ५९ कोटी १३ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ५ लाख ८५ हजार ५१ नागरिकांवर कारवाई करत ११ कोटी ७० लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दिवसाला ९ हजार नागरिकांवर कारवाई
मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या २० एप्रिलपासून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. २७ सप्टेंबर रोजी ९ हजार ६२२ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला ९ हजार ५८९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहिल्यास मुंबईमध्ये रोज ९ हजाराहून अधिक नागरिक मास्क घालत नसल्याचे तसेच योग्य प्राकारे मास्क घालत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
कोरोनाचा त्रिसूत्रीचे पालन करा
कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटोबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
हेही वाचा -राज्यात शनिवारी 2 हजार 696 नवे रुग्ण, तर 49 रुग्णांचा मृत्यू