मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र या नियमावलीमध्ये गोंधळ असल्याने दादर व्यापारी या लॉकडाऊनचा निषेध नोंदवला आहे. दुकानाबाहेर निषेधाचे बॅनर घेऊन दुकानदारांनी टाळेबंदीचा विरोध केला.
दादर व्यापारी संघाचा लॉकडाऊनच्या नियमावलीला विरोध नियमाबाबत नाराजी-
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ वाजेपासून नव्याने जारी केलेल्या निर्बंधांना व्यापारी वर्गासह दुकानदारांमधून विरोध होत आहे. या नियमांमुळे प्रचंड नुकसान होणार आहे, असे म्हणणे व्यापारी आणि दुकानदारांनी मांडले आहे. राज्य सरकारने सोप्या भाषेत नियमावली जारी केली असली तरी बाजारपेठांतील बहुतांशी घटकांकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने गोंधळात भर पडत आहे. दक्षिण मुंबईतील कॉफ्रेड मार्केट, मस्जिद बंदर येथील बाजारपेठा, गिरगाव येथील दुकानदारांनी देखील या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
टाळेबंदीने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले-
मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. यामध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी पहाटे सात वाजेपर्यंत सरसकट संचारबंदी असणार आहे. यादरम्यान सर्व आस्थापना बंद असणार आहेत. परंतु आज अचानक महानगरपालिकेतर्फे दादर परिसरातील दुकाने बंद करायला सांगण्यात आली आहेत. शासनाने काढलेल्या निर्णयांमध्ये सुस्पष्टता नाही आहे. मागच्या सव्वा वर्षाच्या काळात टाळेबंदीने आम्हा व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडलेले असताना आता जर सरसकट दुकान बंद ठेवली तर त्याचा मोठा भुर्दंड त्यांना सोसावा लागणार आहे. म्हणून शासनाच्या निषेधार्थ आम्ही आमच्या दुकानाच्या बाहेर फलक लावले आहेत, असे सुनील शहा यांनी सांगितले.
पोस्टर महानगरपालिकेने फाडले-
दादरमध्ये व्यापाऱ्यांनी दुकानांवर या नियमावलीचे निषेध करणारे स्टिकर्सही चिकटवले होते. मात्र काही वेळातच पोलिसांनी, मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दुकानांवर लावलेले स्टिकर्स काढले. यावेळी दुकानदारांनी त्यांना विरोध केला. खासगी मालमत्तेवर
लावलेले स्टिकर्स तुम्ही काढू शकत नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितल्यानतंर तुम्ही वॉर्ड ऑफीसरला जाऊन विचारा असे उत्तर महापालिका अधिकाऱ्यांनी दिले.
हेही वाचा-भाजपला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या गृहमंत्र्यांचा इशारा