मुंबई - केंद्र शासनाने यंदा बिजी-२ वाणांचे दर वाढविले आहेत. यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहेत. त्यामुळे वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती, केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कापूस बियाण्यांची वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले असून राज्यातील बीटी कापसाचे मोठे क्षेत्र लक्षात घेता, बोंडअळी नियंत्रणाबरोबरच कापूस पिकासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना रूजवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज ( बुधवार) मंत्रालयात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बीटी कापूस बियाणे पुरवठा व त्याच्या दराच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, कृषि विभागाचे अधिकारी व बियाणे उत्पादक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखा
केंद्र शासनाने या वर्षी अधिसूचना जारी करून बिजी-२ वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार आहोत. राज्यात गेल्या दोन तीन वर्षापासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषि विभाग व कापूस बियाणे कंपन्यांनी जिल्हानिहाय समन्वय ठेवुन बोंडअळीचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करावे, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.