महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कर्तबगारीने उंच झेपावलेल्या अन् अज्ञानामुळे पिचलेल्या स्त्रियांमधील अंतर व्हावे कमी' - Dr. Aruna Dhere

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या ६९ व्या दीक्षांत सोहळ्यात डॉ.अरुणा ढेरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी.लिट. या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे यांनाही डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली.

D Litt degree to Dr. Aruna Dhere and Pramilatai Medhe
डॉ. अरुणा ढेरे आणि प्रमिलाताई मेढे यांना एसएनडीटी विद्यापीठाकडून डी. लिट पदवी

By

Published : Jan 20, 2020, 8:52 AM IST

Updated : Jan 20, 2020, 9:27 AM IST

मुंबई - भारतीय स्त्री जीवन हे एका साच्यातले आणि एका पातळीवरचे नाही. ज्यावेळी आपण कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी करतो, त्याच वेळी भारताच्या अनेक कानाकोपऱ्यात छोट्या छोट्या खेड्यांमध्ये आपल्याला अजूनही दबलेल्या अत्याचारांना बळी पडलेल्या आणि अज्ञानामुळे पिचलेल्या स्त्रिया दिसतात.अशा स्त्रियांमधील आणि आपल्या कर्तबगारीने उंच झेप घेणाऱ्या स्त्रियांमधील अंतर कमी करण्याची जबाबदारी आजच्या सुशिक्षित स्त्रियांचीे व नव्या पिढीची आहे. असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकडून डॉ.अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ समाजसेविका प्रमिलाताई मेढे यांना डी.लिट. या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले...

हेही वाचा... नागपूर: संधी मिळाल्यास राजकारण सोडून समाजसेवा करायला आवडेल - नितीन गडकरी

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या ६९ व्या दीक्षांत सोहळ्यात डॉ.अरुणा ढेरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी. लिट या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे यांनाही ही पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीनंतर डॉ. अरुणा ढेरे यांनी ईटीवी भारतशी बोलताना हे मत व्यक्त केले.

'आज आपण नव्या तरुण मुलींना एक संदेश देऊ इच्छिते आहे. की, तुमच्या भोवतीच्या या जगामध्ये असलेल्यांना तुमच्या बरोबरींनी पावले टाकण्यासाठी सक्षम करा. जात, धर्म, वंश यांच्या पलीकडे नैतिकता आणि चारित्र्य या माणसाच्या आजच्या जगात जगतानाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यांची कास धरत आपण प्रगतीच्या मार्गावर चालले पाहिजे. त्यावेळी आपल्या सोबत इतरांनाही घ्यावे, हे आपले कर्तव्य मानूया. आपल्यासाठी जग खुले आहे, तेव्हा झेप घेण्यासाठी सिध्द होऊ या', असे आवाहन अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... अजित पवार म्हणतात... 'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' असं नसतं

एसएनडीटी विद्यापीठाने दिलेल्या डी. लिट. या पदवीबद्दल त्या म्हणाल्या की, याबद्दल मला मनापासून आनंद होतो आणि संकोचही वाटतो. इतक्या मोठ्या कार्य करणाऱ्या, अशा अनेक व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रांमध्ये डोळ्यासमोर आहेत. मी या भावनेने हा सन्मान स्वीकारत आहे की, आपल्या हातून या तऱ्हेची काम करत राहिले पाहिजे. हा मिळालेला सन्मान माझ्या प्रेरणेचा सन्मान आहे, असे आपण मानत असल्याचे त्या म्हणाल्या.

मुलींच्या शिक्षणातील भरारीबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. 'आज इतक्या मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुढे येत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात कित्येकदा तर असे लक्षात येते की, अवघ्या दीड-दोनशे वर्षांमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. ती विचारात घेता हजारो वर्षांच्या न मिळालेल्या संधीचे सोने करत, त्या मुलांच्या किंवा पुरुषांच्या बरोबरीने पावले टाकत आहेत. या सगळ्या संघर्षाचा इतिहास हा एसएनडीटी विद्यापीठाच्या मागे आहे. तो इतिहास जागा असताना, ज्या वाटा अतिशय कष्टाने सुरुवातीच्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेताना रुळवल्या, त्या वाटांवर या नव्या मुली अतिशय आत्मविश्वासाने धडाडीने पुढे चाललेल्या आहेत', याचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा... पुणे जिल्ह्यात 'ज्वारीचे पीक' सर्वाधिक रोगराईच्या संकटात

राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे यांनाही एसएनडीटी विद्यापीठाकडून डी. लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, 'आपल्याकडे स्त्रियांची एक संस्कृतीचा आहे. त्यामुळे अपमान करण्यासाठी हात पुढे आला, तर त्याला पिरगळून टाकण्याची शक्ती महिलांमध्ये यावी. तसे शिक्षण त्यांना मिळावे, यासाठी हे विद्यापीठ प्रयत्न करेल', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Last Updated : Jan 20, 2020, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details