मुंबई - लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगार हे अधिक सक्रिय झाले आहेत. यावेळी ई सीम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना घराबाहेर पडून मोबाईल कंपन्यांच्या गॅलरीत जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी काही निवडक मोबाईल कंपन्यांकडून ई सीम कार्डची सुविधा देण्यात आली आहे. ज्यात मोबाईल फोनमध्ये वापरले जाणारे सीम कार्डची गरज भासत नाही. यावरचा 'ई टीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...
स्पेशल : लॉकडाऊन काळात होतेय ई सीम कार्डच्या माध्यमातून लूट
ई सीम कार्डची सुविधा मोबाईल फोनवर सुरू करण्यासाठी सायबर भामटे हे संबंधित व्यक्तीला फोन करून संवाद साधतात. यावेळी ते मोबाईल कंपनीकडून बोलत असल्याचे सांगत ई सीम कार्डची सर्विस सुरू करण्यासाठी नमूद ईमेलवर मेल करण्यास सांगतात.
ई सीम कार्डची सुविधा मोबाईल फोनवर सुरू करण्यासाठी सायबर भामटे हे संबंधित व्यक्तीला फोन करून संवाद साधतात. यावेळी ते मोबाईल कंपनीकडून बोलत असल्याचे सांगत ई सीम कार्डची सर्विस सुरू करण्यासाठी नमूद ईमेलवर मेल करण्यास सांगतात. मेल केल्यानंतर संबंधीत व्यक्तीला ऑटोमेटेड व्हेरिफिकेशन कॉल येतो. या दरम्यान तुमच्या मोबाईल फोनवर 1 क्रमांक नमूद करण्यास सांगितले जाते, जेणेकरून तुम्हाला ही ई सीम कार्डची सर्विस असल्याचे कन्फम केले जाते. यानंतर पीडित व्यक्तीला क्यूआर कोड ( क्विक रिस्पॉन्स कोड ) हा पाठवून त्यास स्कॅन करण्यास सांगण्यात येते. हा क्यूआर कोड पीडित व्यक्ती ज्या मोबाईलवरून स्कॅन करते त्या मोबाईल फोनवर तात्काळ ई सीमची सुविधा सुरू होते.
यासर्व प्रकारादरम्यान सायबर भामटे फोनवरून पीडित व्यक्तीकडून ई मेलवर आलेला क्यूआर कोड मागवून तो त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलवर स्कॅन करून घेतात, असे केल्याने पीडित व्यक्तीच्या मोबाईलमधील बँकिंग व्यवहाराशी निगडित सर्व गोपनीय माहिती चोरली जाते. एवढंच नाही तर दरवेळी येणारे ओटीपी नंबरसुद्धा सायबर गुन्हेगार हे आपोआप चोरून तुमच्या बँक खात्यातून सर्व पैसे उडवतात.. ई सीम कार्डची सुविधा भारतात सध्या गुगल, सॅमसंग, मोटोरोला व अॅपल सारख्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. सायबर गुन्हेगारांच्या नियंत्रणात तुमचा मोबाईल फोन गेल्यानंतर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक ऑनलाईन व्यवहारावर त्यांचे लक्ष असते, तुम्ही कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन पेमेंट करत असताना तुम्ही देत असलेले क्रेडिट /डेबिट कार्ड नंबर, सिवीवी नंबर , ओटीपी हे सायबर गुन्हेगारांना सहज मिळून तुमची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असे सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांचे म्हणणे आहे.