मुंबई -मुंबईच्या वीज पुरवठ्यावर सायबर हल्ला झाला असून, ८ जीबी डाटा चोरीला गेल्याची माहिती, विधान परिषदेचे तालिका सभापती गोपीकिशन बाजोरिया यांनी परिषदेत दिली. १२ ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅक आउट झाला होता, याबाबत महाराष्ट्र सायबर सेलने चौकशी करून अहवाल १ मार्च २०२१ रोजी सरकारला सादर केल्याचे बाजोरिया म्हणाले.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सादर केला चौकशी अहवाल
मुंबईत १२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजेच्या सुमाराला विद्युतपुरवठा करणाऱ्या ४०० के.व्ही. वाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. तसेच मुंबईस्थित वीज निर्मितीचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबईचा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते. मात्र, या मागे घातपाताची शक्यता असू शकते, अशी शंका असल्याने राज्य सरकारने या प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी केली. या चौकशीचा अहवाल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनासमोर ठेवला. तालिका सभापती बाजोरिया यांनी तो परिषदेत मांडला.
चौकशीसाठी समिती
दरम्यान या प्रकरणी सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत आयआयटी मुंबई, व्हीएनआयटी नागपूर, व्हीजेटीआय मुंबईमधील तज्ज्ञ प्राध्यापक तसेच ऊर्जा विभागातील वरिष्ठ तांत्रिक अधिका-यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणानेही १२ ऑक्टोबर २०२० रोजी तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली होती. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) देखील समितीची नियुक्ती केली. या समितीने अहवाल तयार केला आहे.
काय म्हटले आहे अहवालामध्ये?
१) विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश करून, वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही ट्रोझन हॉर्सेसनी या आधीही जगात अशा प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत.