मुंबई - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या गेल्या अडीच वर्षात ४ लाटा आल्या. या चारही लाटा रोखण्यात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. या अडीच वर्षाच्या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या १७ व्हेरियंट आणि सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रॉन या तीन व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार झाला होता. त्यानंतर मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या तीन महिन्यात BA.२.७५ आणि सब व्हेरियंटचा प्रसार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत कोरोनाचा प्रसार -मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात एकूण ११ लाख ३३ हजार ५०४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ८ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. या पहिल्या लाटेत दिवसाला सर्वाधिक २८०० रुग्णांची नोंद झाली. जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजार, डिसेंबर २०२१ मध्ये तिसऱ्या आलेल्या तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार तर जून २०२२ मध्ये आलेल्या चौथ्या लाटेत २३०० अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत या व्हेरियंटचा प्रसार -मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार आहे, तो किती प्रमाणात आहे. यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या (Genome Sequencing Test) करण्यात आल्या. ऑगस्ट २०२१ मध्ये पहिल्यांदा या चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोना, अल्फा, केपा, नाइंटिन ए, ट्वेन्टी ए, डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ओमायक्रोन, स्टेल्थ बी 2, ओमायक्रोनचे उपप्रकार असलेल्या BA २.७४, BA २.७५, BA २.७६, BA २.३८, BA ५ , BA २.३८.१, BA ४ या व्हेरियंटचेही रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अडीच वर्षात मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या तब्बल १७ व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रोन या विषाणूंमुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झाला आहे.
सध्या ओमायक्रोनच्या BA.२.७५ सबव्हेरियंटचे रुग्ण -मुंबईमध्ये मे २०२२ च्या मध्यानंतर कोरोनाची चौथी लाट आली. जून जुलै दरम्यान रुग्णसंख्या वाढली होती. त्यासाठी पालिकेने १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील २८८ नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली. त्यात ३७ टक्के अर्थात १०६ नमुने हे ओमायक्रोनचा सबव्हेरियंट असलेल्या BA.२.७५ चे आहेत. ३३ टक्के अर्थात ९६ नमुने हे BA.२.७५.१ सब व्हेरिएन्टचे आहेत. २१ टक्के म्हणजेच ६० नमुने हे BA.२.७५.२ सब व्हेरिएन्टचे आहेत. २ टक्के अर्थात ६ नमुने हे प्रत्येकी BA.५.२ व BJ.१ या दोन सब व्हेरिएन्टचे आहेत. एकूण ४ नमुने हे BA.२.७६ या सब व्हेरिएन्टचे आहेत. ३ नमुने हे BA.२ या सब व्हेरिएन्टचे आहेत. २ नमुने हे BH.१ या सब व्हेरिएन्टचे आहेत तसेच BA.२.१०.४, BA.२.७४, BA.५.१, BE.१ आणि BE.३ या सब व्हेरिएन्टचे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.