मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता ओसरल्यानंतर राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. मात्र, राज्यात मान्सूनचे आगमन आणि लॉकडाऊनची शिथिलता ही वेळ जुळून आल्याने राज्यातील निर्सगप्रेमी पर्यटकांना पर्यटनस्थळे आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या केसेस वाढत आहेत, अशा परिस्थितीत पिकनिक स्पॉटवर वाढणारी गर्दी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढीसाठी मुख्य कारण ठरू शकते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत आणि ते कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने कशा प्रकार धोकादायक या संदर्भातील ईटीव्ही भारतचे हे विशेष वृत्त..
कोरोनाच्या संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे महाराष्ट्रात २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. डेल्टा प्लसचे रत्नागिरीत ९, जळगावात ७ तर मुंबईत २ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण डेल्टा प्लसने बाधित झाल्याचे आढळून आले आहेत. तर जळगावात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेपूर्वीची राज्यासाठी पूर्वसूचना देणारी धोक्याची घंटा समजायला हवे असे जाणकांरांचे मत आहे.
तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार डेल्टा प्लस?
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या वर्षीपासून राज्यात सण उत्सव साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर दिवाळी काळात पहिली लाट ओसरल्याने राज्य अनलॉक झाले. मात्र, वाढत्या गर्दीने आणि कोरोना प्रतिबंधात्मक लस नसल्याने राज्यासह भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, आता डेल्टा व्हेरीएंट नावाचे कोरोना विषाणूचे नवीन रुप समोर आले आहे. कोरोनावरील लशीला आणि अँटीबॉडीजला डेल्टा प्लस जुमानत नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतका हा विषाणू भयानक आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेला डेल्टा प्लस कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, सध्या राज्यात नुकतेच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पर्यटनस्थळावर पाहायला मिळत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असल्याने योग्य काळजी न घेतल्याने इतर दुर्घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकतेच छिंदवाडा येथील धबधबध्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. नागपुरातील एक कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी सौसरमधील घोगरा धबधब्यावर गेले होते. नदीच्या मध्यभागी बसून केक कापण्याची त्यांची योजना होती. मात्र, अचानक नदीला पूर आला आणि कुटुंबातील 12 जण पूरात अडकले. पूरातून त्यांची सुटका करण्यात आल्याचा प्रकार ही समोर आला आहे.
पालघरच्या आशेरी गडावर पर्यटकांची गर्दी-
पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना या गावातील आशेरी गडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळात आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले होते. गडावर पर्यटकांनी तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले होते. पावसामुळे हा परिसर हिरवळीने नटला असल्याने पालघरसह, मुंबई, ठाणे, गुजरात या बड्या शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले होते.
लोणावळ्यातील गर्दी धोकादायक-
लोणावळ्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आठवडाभरापासून शहरासह परिसरात वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकर पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. या ठिकाणी पर्यटक लोणावळ्यातील विविध पर्यटनस्थळी हजेरी लावून कुटुंबासह मनमुराद आनंद लुटताना मोठ्या प्रमाणात गर्दीही करत आहेत. या ठिकाणी पुणे, मुंबईसह, परराज्यातून आणि देशातून पर्यटक येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने लोणावळा हे शहर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटच्या प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकते.