मुंबई- कोरोनाच्या तीव्रता कमी होताच कोरोना संबंधित नियमाचे पालन करून 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतल्याना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर आता युद्धपातळीवर सुरू असलेल्या कोरोना लसीकरणामुळे ( Vaccination in Mumbai ) लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत ( Crowd Increased in Local Trains ) जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. डिसेंबरमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्या 64 लाखांपर्यंत गेली आहे. कोरोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सरासरी 80 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत होते. मात्र, आता हा आकडा 64 लाखांवर पोहोचला आहे.
लसीकरणामुळे प्रवासी संख्येत वाढ -
मुंबईसह संपूर्ण देशात सध्या कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबईत 98 लाख नागरिकांनी कोरोना लसीची पाहिली मात्र घेतली आहे. 78 लाख नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ठाणे पनवेल, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकाकडूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकलच्या प्रवासींची संख्याही वाढत आहे. कोरोनापूर्व काळात दररोज सरासरी 80 लाख जण रेल्वेने प्रवास करत होते. त्यानंतर निर्बंधांमुळे ही संख्या सुरुवातीलस काही हजारांवर मग पोहोचलही होती. आता हा आकडा 64 लाखांवर पोहोचला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पूर्व काळात मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सरासरी 45 लाख जण प्रवास करत होते. 13 डिसेंबर रोजी 36.22 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज सरासरी 35 लाख जण प्रवास करत होते. 13 डिसेंबरला 28 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तसेच वातानुकूलित लोकलचीही प्रवासी संख्या वाढत असून पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून 1 ते 14 डिसेंबर दरम्यान एक लाखहून अधिक जणांनी प्रवास केला.