मुंबई - ट्रॅव्हल एजन्सीला लाखोंचा चुना लावणाऱ्या 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या त्रिकुटाने ग्राहकांकडून तिकिटांचे पैसे घेऊन ते संबंधित बुकिंग एजन्सीला न देता कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. राघवेंद्र रामपाल सिंग, राजप्रताप सिंग परमार आणि प्राणसिंग परमार, असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत.
ट्रॅव्हल एजन्सीला कोट्यवधींचा चुना; पोलिसांनी ठोकल्या त्रिकूटाला बेड्या - Arrested
तीन जणांनी ग्राहकांकडून तिकिटांचे पैसे घेऊन ते संबंधित बुकिंग एजन्सीला न देता करोडो रुपयांचा चुना लावला आहे. तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीच्या पेमेंट गेटवेमध्ये फेरफार करत राघवेंद्र रामपाल सिंग, राजप्रताप सिंग परमार आणि प्राणसिंग परमार हे पैसे न भरता तिकिटे ग्राहकांना देत होते.
राघवेंद्र, राजप्रताप, आणि प्राणसिंग हे ऑनलाईन तिकिटे बुक करून ग्राहकांकडून रोख रक्कम घेत होते. मात्र संबंधित तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीच्या पेमेंट गेटवेमध्ये फेरफार करत पैसे न भरता तिकिटे ग्राहकांना देत होते. या आरोपींनी गेल्या काही महिन्यात करोडो रुपये लाटले होते. मिळविलेल्या पैशातून या आरोपींनी मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात त्यांच्या गावात मोठेमोठे राजकीय कार्यक्रम घेऊन स्थानिक राजकारणात जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र करोडो रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात यात्रा डॉट कॉम, क्लियर ट्रिप व मेक माय ट्रीप सारख्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तापास सुरु केला होता. तक्रारदार असलेला जावेद ( नाव बदलले आहे.) याने डिसेंबर २०१८ मध्ये गोव्याला जाण्यासाठी एका खासगी एजंटच्या माध्यमातून ऑनलाईन मुंबई ते गोवा विमानाचे तिकीट बुक केले होते. तिकीट बुकिंगसाठी जावेदने त्याचा ई -मेल आयडी व मोबाईल क्रमांक सुद्धा दिला होता. ट्रॅव्हल एजंटकडून मिळालेल्या पीएनआर नंबरवर जावेदने जेव्हा तिकीटाची प्रिंट ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला असता तिकिटावर मोबाईल क्रमांक व ई - मेल आयडी वेगळा असल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर या तिकिटासाठी करण्यात आलेल्या पेमेंटच्या तपशिलात फरक असल्याचेही जावेदच्या लक्षात आले. या प्रकरणी जावेदने गुन्हे शाखेच्या युनिट 7 कडे तक्रार केली. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे. न्यायालयाने या तीन आरोपीना 17 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.