मुंबई - राज्यात येत्या तीन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. केंद्र शासनाच्या बैठकीतही सूचना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याचे मंत्री टोपे यावेळी म्हणाले. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाला गती दिली जाईल. राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून, रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही, याबाबत देखील राज्य शासनाने नियोजन केल्याची माहिती यावेळी टोपे यांनी दिली.
पेडीयाट्रीक व्हेंटीलेटर तयार ठेवणार
कोरोना संक्रमणाची बाधा लहान मुलांना देखील होत आहे. अशांतच १८ वर्ष वयापेक्षा लहान गटातील मुलांचे आपण लसीकरण करत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने लागणारे बेड, पेडीयाट्रीक व्हेंटीलेटर किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचे बेड लागतात ते देखील आपल्याला तयार करून ठेवले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री १० वाजता व्हीसी घेऊन अनेक पेडीयाट्रीशन्सशी चर्चा केल्याची माहिती मंत्री टोपे यांनी दिली आहे. “बेडची संख्या वाढवणे, ऑक्सिजन व कोविड संदर्भातील औषधांबाबत राज्याला स्वयंपूर्ण करण्याबाबत तयारी सुरू असल्याचेही टोपे यावेळी म्हणाले.
कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देणार
लसींचा साठा अपुरा आहे. केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होतो आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केले आहे. अशा केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील केंद्रांवरही अशीच स्थिती आहे. मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे, अशा लोकांनी 'कोविन'वर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतले. स्थानिक भागात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत मी चर्चा केली. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागतील. वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येतो का ते तपासावे लागेल. शिवाय, ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यात सहव्याधी असलेल्या लोकांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल का, याबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही यावेळी टोपे म्हणाले.