महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा; प्रविण दरेकर यांची मागणी - कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ

राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी मांडलेली आहे.

Pravin Darekar
प्रविण दरेकर

By

Published : Mar 4, 2021, 7:31 PM IST

मुंबई -वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. ते सन २०२०- २१ च्या पुरवणी मागण्यांवर आज विधान परिषदेत बोलत होते.

स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करा

राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी मांडलेली आहे. राज्यातील मागास भागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यघटनेत वैधानिक विकास मंडळाची तरतूद करण्यात आली, परंतु, वर्षभर या मंडळांना मुदतवाढ दिली गेली नाही, या भागांसाठीचा निधी अन्य भागांकडे वळविला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु, गेले वर्षभर महाविकास आघाडी सरकार याबाबतीत निर्णय घेण्यास तयार नाही. हा निर्णय तर सरकारने घ्यावाच पण त्याबरोबरच वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी सुध्दा स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे, अशी आग्रही मागणी दरेकर यांनी केली.

कोकणासाठी भरीव तरतूद करा

कोकणाच्या तोंडाला अनेकांवेळा पाने पुसली जातात, मच्छीमारांचा प्रश्न आहे, पर्यटनाचा विषय आहे, परंतु, कधीच कोकणासाठी अधिकच्या निधीची तरतूद केली जात नाही. कोकण विकासासाठी एक इंटिग्रेटेड डेव्‍लपमेंट आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्याचं काम सातत्याने कोकणाने केलं आहे, पण गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोकणासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचं दिसून आलं नाही, कोकणातील अनेक प्रकल्प अपुरे असल्यामुळे येत्या अर्थसंकल्पात कोकणासाठी भरीव तरतूद करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

पर्यटनाचा आराखडा कागदावर

कोकण- मुंबई- गोवा महामार्ग व कोकणातील अनेक महामार्गाचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यांच्या कामांना त्यांच्या मदतीने राज्य सरकारने गती द्यावी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पर्यटनासाठी दोनशे-अडीचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असला तरी निधीअभावी हा आराखडा कागदावरच राहिला आहे. त्यामुळे कोकणवासियांना केवळ गोंडस स्वप्नं दाखवण्याचं काम होत आहे. पर्यटनाच्यादृष्टीने पूर्ण कोकण विकसित होऊ शकतं, अगदी पालघरसारख्या आदिवासी पट्ट्यातही अनेक प्रकल्प उभे राहू शकतात, अनेक मंदिरं, गडकिल्ले, समुद्र किनारपट्टी आपल्या महाराष्ट्रात विशेषत: कोकणात आहे, यासाठी किमान ५ हजार कोटींचा इंटिग्रेटेड आराखडा तयार करावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विषय देखील त्यांनी या चर्चेत उपस्थित केला. एसटी कर्मचारी दिवस-रात्र राबत असताना ३ - ३ महिने त्यांना पगार मिळत नाही, भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांना २ महिन्यांचा पगार मिळाला, हाही प्रश्न सरकारने हाताळला पाहिजे. तसेच एसटी महामंडळाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आराखडा बनवण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली.

वनविभागाच्या जमिनीवरील रहिवाशांना घरं द्या

ठाणे आणि मुंबईमधील वन जमिनींवर लाखोंच्या संख्येने झोपडपट्टी उभारली गेली आहे. केतकीनगर, दामूनगर, अशा अनेक विभागात वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. परंतु, कोर्टाचे निदेश पुढे करुन या गरिबांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. वन जमिनींच्‍या बॉर्डरवरील एस.आर.अे. स्किमला वाढीव एफएसआय देऊन वनजमिनींवरील या गरीब रहिवाशांना सदनिका दिल्यास हा विषय कायमचा सुटु शकतो, यासाठी गृह मंत्री यांनी एस.आर.अे., वन विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी चर्चेत केली.

हेही वाचा -फडणवीसांचे तृतीयपंथीयासोबतच्या पोस्टप्रकरणी कारवाईचे अजित पवारांचे आदेश

हेही वाचा -शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेणार - शालेय शिक्षण मंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details