मुंबई - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ( पोक्सो ) गुन्हा दाखल करण्याबाबत परिपत्रक काढले होते. मात्र हे परिपत्रक मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मागे घेण्याचा आदेश मंगळवारी दिला आहे. संजय पांडे यांनी काढलेल्या परिपत्रकाविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी देखील विरोध दर्शवला होता. या प्रकरणात जनहित याचिका देखील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
पोक्सोचा गुन्हा ही गंभीर बाब -जुनी भांडणे, प्रॉपर्टीचे वाद, वैमनस्य अशा अनेक कारणांमुळे पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी झाल्या आहेत. अनेक लोक जाणूनबुजून पोक्सोचे गुन्हे नोंदवत असल्याचा संशय व्यक्त करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोक्सोशी संबंधित आदेश जारी केला होता. परंतु विवेक फणसाळकर यांनी हा आदेश तात्काळ मागे घेण्यास सांगितले आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा ही गंभीर बाब आहे, त्याची तात्काळ नोंद करुन तपास सुरु करावा असे फणसाळकर यांनी सांगितले आहे.
जुन्या वादातून पोक्सो आणि विनयभंगाच्या तक्रारी -माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मागील महिन्यात 6 जूनला पोक्सो संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. यापुढे पोक्सोच्या ( POCSO ) होणाऱ्या गैरवापरामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले होते. जुन्या वादातून मालमत्तेच्या वादातून किंवा अन्य कोणत्याही वैमनस्यातून पोलीस ठाण्यात पोक्सो आणि विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा आरोपी निर्दोष ठरतो. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्याची बदनामीही होते. प्रथम सहायक आयुक्त अशा तक्रारीची चौकशी करतील. त्यानंतर अंतिम आदेश उपायुक्त देतील, त्यानंतर गुन्हा दाखल करा असे या आदेशात म्हटले होते.
पडताळणी करुन तात्काळ गुन्हा दाखल करा -मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हा आदेश मागे घेतला आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा ही गंभीर बाब असून पोक्सोची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी करा. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करुन तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिल्या आहेत.