महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! कोव्हिशिल्ड काही तासात मुंबईच्या मनपा कार्यालयात होणार दाखल - कोव्हिशिल्ड अपडेट न्यूज

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लसचे (कोव्हिशिल्ड) कंटेनर हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ही लस काही तासात मुंबईच्या मनपा कार्यालयात लस दाखल होणार आहे.

लस रवाना होताना
लस रवाना होताना

By

Published : Jan 13, 2021, 1:11 AM IST

Updated : Jan 13, 2021, 1:37 AM IST

मुंबई- देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबईसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारी सीरमची कोव्हिशिल्ड काही तासातच मुंबईत दाखल होत आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लसचा साठा (कोव्हिशिल्ड) हा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. ही लस काही तासात मुंबईच्या मनपा कार्यालयात दाखल होणार आहे.

संबंधित बातमी वाचा-कोरोनावरील लस उद्या येणार; मुंबई, जालन्यात १६ जानेवारीपासून लसीकरण

देशभरात लसीकरण सुरू होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. याअनुषंगाने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार सोमवारी दुपारपासून 6 ते 8 कोल्ड स्टोरेज कंटेनर भरण्याचे काम सुरू आहे. तर हे सर्व कंटेनर रस्ते मार्गे महाराष्ट्र आणि अन्य शेजारच्या राज्यात नेण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील काही कंटेनर हे मुंबईसाठी असल्याची माहिती कुणाल अग्रवाल, संचालक, कुल एक्स कोल्ड चैन यांनी दिली आहे. त्यानुसार हे कंटेनर आज पहाटे दाखल होणार आहेत.

कोव्हिशिल्ड काही तासात मुंबईच्या मनपा कार्यालयात होणार दाखल

संबंधित बातमी वाचा-आज मुंबईत लस येणार! रात्री 12 नंतर मुंबईसाठी कोल्डस्टोरेज कंटेनर निघण्याची शक्यता

पहिली लस परेल येथे साठवणार -

मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत शीतगृह उभारण्यात आले आहे. या शीतगृहामध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे १० लाख लसी साठवता येऊ शकतात, अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे अशा २ लाख लोकांची नावे कोविन अ‌ॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे शीतगृहामध्ये साठवली जाईल. मात्र, लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस -

पालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी ९ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी ७२ बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक ५ बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान १०० जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

Last Updated : Jan 13, 2021, 1:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details