महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गरीबांना कोरोना लस मोफत देण्याची केंद्राकडे मागणी करणार - राजेश टोपे - Rajesh Tope latest news

दारिद्रय रेषेखालील लोक, विषाणुचा ज्याच्यावर परिणाम होऊ शकतो अशा नागरिकांना लस मोफत दिली पाहिजे. लसीच्या दोन डोससाठी ५०० रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारने हा खर्च सहन केला पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jan 5, 2021, 3:09 PM IST

Updated : Jan 5, 2021, 4:15 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने दोन लसींना परवानगी दिली आहे. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी 'ड्राय रन' घेतले जाणार आहे. गरिबांना लस मोफत दिली पाहिजे, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. मुंबईमधील लोकल ट्रेन संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

८ जानेवारीला ड्राय रन -
केंद्र सरकारने दोन लसीला परवानगी दिल्यानंतर देशातील काही जिल्ह्यांत ड्राय रन घेण्यात आला. राज्यातही सर्व जिल्ह्यात येत्या ८ जानेवारीला ड्राय रन घेण्यात येणार आहे. मुंबईतही त्याच दिवशी ड्राय रन घेण्यात येणार आहे. या ड्राय रन दरम्यान अ‌ॅप योग्य प्रकार चालते का? ज्या याठिकाणी लसीकरण होणार आहे, त्याठिकाणी इंटरनेट योग्य प्रकारे चालते का? कर्मचाऱ्यांमध्ये योग्य प्रकारे समन्वय आहे का? हे पाहून त्यात दुरुस्ती करायला वाव असतो. यासाठी ड्राय रन गरजेचा असल्याचे टोपे म्हणाले.

हेही वाचा-कोविड-19 लसीकरण मोहिमेस पुणे प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

गरिबांना लस मोफत द्यावी -
कोरोनावरील लसीला किंमत ठेवल्यास ती लस प्रत्येक नागरिक घेऊ शकत नाही. सध्या केंद्र सरकार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करला लस मोफत देणार असल्याचे सांगत आहे. इतर नागरिकांनाही लस मोफत मिळायला हवी. दारिद्रय रेषेखालील लोक, विषाणुचा ज्याच्यावर परिणाम होऊ शकतो अशा नागरिकांना लस मोफत दिली पाहिजे. लसीच्या दोन डोससाठी ५०० रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारने हा खर्च सहन केला पाहिजे, असे टोपे यावेळी म्हणाले.

राज्य सरकार मागे राहिले नाही -
कोरोनाविरोधातील युद्धादरम्यान केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. म्हणून राज्य सरकार मागे राहिलेले नाही. टेस्ट किट, व्हेंटिलेटर, लागणारी औषधे, इंजेक्शन आदी वस्तू राज्य सरकराने खरेदी करून नागरिकांना मोफत देण्याचे काम केले आहे. रुग्णांना अडचणी येऊ नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालिका आयुक्तांना खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले होते. यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार करता आल्याचे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोना लसीकरणासाठी ठाणे पालिका सज्ज; नव्या वर्षात ६ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण

८ प्रवासी पॉझिटिव्ह -
ब्रिटन आणि युके येथून २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान ५ हजार प्रवासी राज्यात आले. त्यांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. नवा व्हायरस तोच असला तरी संसर्ग गतीने पसरवतो. यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाइन रहावेच लागेल. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन केले जाईल. महाराष्ट्रात जी पद्धत अवलंबली जात आहे. तीच पद्धत इतर राज्यांनी अवलंबली पाहिजे, असे टोपे म्हणाले.

डीसीजीआयची दोन लसींना परवानगी..

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली. तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. त्यास रविवारी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतात लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details