महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संपूर्ण राज्यात कोविडचाचणी फिरत्या प्रयोगशाळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाइस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील.

covid
covid

By

Published : Feb 11, 2021, 4:19 PM IST

मुंबई -मुंबईत स्पाइस हेल्थ फिरत्या कोविड चाचण्या व्हॅनचे लोकार्पण झाले. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाइस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोनाचाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

एनएबीएल अ‌ॅक्रिडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाइस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाइस जेटचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाइस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता

गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोनाचाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५००वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करताना सहव्याधीग्रस्तांचा शोधही घेण्यात आला.

कमी वेळेत मिळणार चाचणीचा अहवाल

कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरू आहे. त्यामुळे आजही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. अशा गरजेच्यावेळी स्पाइस हेल्थने पुढे येऊन परवडणाऱ्या दरात कोरानाचाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. कमी वेळेत त्या चाचणीचा अहवालही मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल.

रुग्णांचा शोध घेणे महत्त्वाचे

मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राइव्ह हातात घेता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणे, त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच उपचार, क्वारंटाइन करणे शक्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details