मुंबई -मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. नागरिकांचीही चांगली साथ मिळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिलमध्ये ४५ दिवसांवर आला होता. मात्र गेल्या काही महिन्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने हा कालावधी ९ नोव्हेंबर रोजी २२४४ दिवसांवर गेला आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २६१६ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असाल तरी आम्ही परिस्थितीवर आणि रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी २६१६ दिवसांवर -
मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला होता. १ मे रोजी ९६ दिवस, १ जून रोजी पासून ४५३ दिवस, १ जुलै रोजी ७३३ दिवस, १ ऑगस्ट रोजी १४५८ दिवस, १ सप्टेंबर रोजी १४७९ दिवस, १ ऑक्टोबर रोजी हा ११५९ तर १ नोव्हेंबर रोजी हा कालावधी १५९५ दिवस इतका नोंदवला गेला. ऑगस्टमध्ये दिवसाला हा कालावधी २०५८ दिवसांवर पोहचला होता. त्यानंतर हा कालावधी घसरला होता. ९ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २२४४ दिवस इतका नोंद झाला. तर २५ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २६१६ दिवसांवर पोहचला आहे.
७ लाख ६१ हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी मार्च महिन्यात आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत गेल्या पावणे दोन वर्षात ७ लाख ६१ हजार ९५५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लक्ष ४० हजार ७०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १६ हजार ३१९ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर २३६४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी झाल्याने एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. तर ज्या इमारतीमध्ये ५ रुग्ण आढळून येत आहेत अशा १६ इमारती सील करण्यात आल्या आहेत.