महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात सोमवारपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; ज्येष्ठांसाठी विशेष मोहीम - कोरोना लसीकरण महाराष्ट्र

सुरुवातीस मुंबईतल्या 2 ते 3 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळणार असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात येत आहे. तसेच रुग्णांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

By

Published : Feb 28, 2021, 12:51 PM IST

मुंबई- सोमवारपासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. यात 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालये तसेच कोविड सेंटर या लसीकरणासाठी सज्ज असणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयामध्ये देखील लसीकरण होणार असल्याचे वृत्त असले तरी, या खासगी रुग्णालयाची लसीकरण करण्याची क्षमता (लस साठवणुकीची क्षमता, आरोग्य कर्मचाऱ्यांना लसी देण्याचं ट्रेनिंग, आयसीयूची व्यवस्था ) तपासूनच परवानगी देणार असल्याचे मुंबई मनपाकडून सांगण्यात येत आहे.

सुरुवातीस मुंबईतल्या 2 ते 3 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळणार असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात येत आहे. तसेच रुग्णांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कुठे कराल नोंदणी ?

कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली जाणार. 27 आणि 28 फेब्रुवारी या दोन दिवशी कोविन अॅप अपग्रेडसाठी पूर्णपणे बंद आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोविन अॅप मध्ये हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर असे दोन कॉलम होते. मात्र आता 60 वयोगटापेक्षा जास्त आणि 45 ते 60 वयोगट मात्र गंभीर आजारानेग्रस्त असलेल्या व्यक्तिंसाठी कॉलम तयार करण्यात आला आहे. हा कॉलम तयार झाल्यानंतरच यावर नोंदणी केली जाऊ शकते.

नोंदणीसाठी काय कराल ?


45 ते 60 वयोगटातील ज्या व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा व्यक्तिंना मेडिकल सर्टिफिकेटची अवश्यता असेल. हे सर्टिफिकेट कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (डॉक्टर) कडून प्रमाणित असणे आवश्यक आहे. तसेच गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटीज) समावेश आहे. ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयांच्या व्यक्तींसाठी मात्र नोंदणी सहज-सोपी असेल. या व्यक्तींना केवळ आधार कार्डाच्या माध्यमातून आपली ओळख पटवता येणं शक्य होईल

लसीची किंमत किती ?
खासगी रुग्णालयात 250 रुपयांना ही लस मिळणार आहेत. तर पालिका आणि सरकारी रुग्णालयात ही लस मोफत दिली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details