नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 95 लाखांचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 35 हजार 551 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 24 तासांमध्ये 526 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 95 लाख 71 हजार 559 वर पोहचला आहे. आतापर्यंत 90 लाख 16 हजार 289 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 39 हजार 188 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 16 हजार 82 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात पुढील काही आठवड्यांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होईल
देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना देशात पुढील काही आठवड्यांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच या लसीचे विविध राज्यात वितरण करताना राज्य सरकारचा सल्ला घेतला जाईल, त्यांच्या सल्ल्यानुसार कोरोना लसीचे वितरण केले जाईल असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वात प्रथम कोविड योद्धा आणि आरोग्य कर्मचार्यांना ही लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 229 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 229 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 776 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 127 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचला आहे. यापैकी 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 83 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी म्हणजे राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या टक्केवारीमध्ये देखील घट झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 2.58 टक्क्यांवर आले आहे.