मुंबई - डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात उद्योगपती अविनाश भोसले यांना 26 मे रोजी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांना 27 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी वेळेअभावी दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे 30 मे रोजी पुन्हा अविनाश भोसले यांना हजर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आज देखील दोन्ही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला असला तरी आज वेळेअभावी न्यायालयाने अविनाश भोसले यांच्या CBI कोठडीवर निर्णय राखीव ठेवला आहे. उद्या यावर न्यायालय निर्णय देणार आहे.
अटक केल्यानंतर अविनाश भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयकडून अविनाश भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकीलांनी रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी इथल्या घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.