मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना खांद्यावरील शस्त्रक्रिया जेजे रुग्णालयातच करावी लागणार आहे. हा अनिल देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे.
मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने केली अनिल देशमुखांना अटक -अनिल देशमुखांच्या या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना परवानगी नाकारली आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी नाकारल्यामुळे आता जे. जे. रुग्णालयातच अनिल देशमुख यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया होईल. उपचार सुरू असताना देशमुख परिवारातील कोणता सदस्य देशमुखांजवळ थांबेल, त्याचे नाव कोर्टाने द्यायला सांगितले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे केली होती.
काय आहे प्रकरण -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर 12 तास चौकशी केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. त्यात आपल्या दुखऱ्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र सरकारी जे.जे. रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील अपुऱ्या सुविधामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाकडे स्व:त बाजू मांडताना केली होती.