मुंबई- पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. गुन्हे शाखेने समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची न्यायालयाकडे मागणी केली. मात्र न्यायालयाने या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली.
आज झालेल्या युक्तीवादात गुन्हे शाखेने घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट मिळाली नाही. या तिन्ही संशयित आरोपी शिकवल्यासारखे बोलतात. तपासात जराही मदत करत नसल्याचा गुन्हे शाखेने दावा केला. समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. घटना घडली त्यादिवशी पायल आरोपींच्या सोबत होती. मात्र दुपारनंतर ही घटना घडली. यादरम्यान नक्की काय झाले हे शोधणे आवश्यक असल्याचेही गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले.
पायल तडवी प्रकरणातील साक्षीदार स्नेहल शिंदेने आरोपींच्या विरोधात साक्ष दिली. स्नेहल शिंदे ही पायलची सहकारी होती. तिच्यासमोर पायलला जातीवाचक टोमणे मारण्यात आल्याचा दावा वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवाद करताना केला. डॉ. हेमा अहुजा पायल ताडवीला तू मागासवर्गीय कोट्यातून आली आहेस, असे म्हणाल्या होत्या. पण मी रँकवर आली असून टॉप केले आहे, असे पायलने सांगितल्याची साक्ष स्नेहल शिंदेने पोलिसांकडे दिली आहे. पायलच्या कुटुंबियांकडून वकील राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला.