मुंबई - शरद पवार (Sharad Pawar House Protest) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टात याबाबत आज सुनावली झाली. या प्रकरणी आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. तर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) हे हल्ला झाला त्यावेळी हजर नसल्याने त्यांचा हल्ल्यात सहभाग नव्हता यामुळे त्यांना जामीन द्या, अशी मागणी आरापींच्यावतीने करण्यात आली होती.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद -सर्व कामगारांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत. काहींनी मद्यपान केल्याचा संशय पोलिसांना असल्याने हे नमुने घेतले असून, ते नमुने कलिना येथील वैद्यकिय प्रयोग शाळेत पाठवण्यातआले आहेत. कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱया ४ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व प्रकारामागे सदावर्ते हे एकटे नसून, अन्य जणांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. रक्ताच्या नमुन्यांचाअहवाल येण्यास ३ ते ४ दिवस लागतील. आरोपींची संख्या मोठी असल्याने चौकशी करायला वेळ लागत आहे. आरोपींनी तेथील अनेक गोष्टींचे नुकसान केले आहे, त्याचे सीसीटीव्हीही आहेत. आरोपीची भाषा ही कुणीतरी बोलायला लावणारी होती. त्यामुळे नक्कीच त्यांना भडकवले असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. हे सर्व सुनियोजित होते, आरोपींनी माध्यमांना दिलेली भाषणे पाहिली तर अनेक गोष्टी स्पष्ठ होताना दिसत आहेत. या घटनेत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर चप्पल, दगड मारले आहेत. एका पोलिसाला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. अटक केलेले आरोपी तपासाला सहकार्य करत नाहीत. चुकीची नावे सांगत आहेत. यावर असाही संशय येतो की हे खरंच ST कामगार आहेत? गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे.