मुंबई -शंभर कोटींच्या वसूलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात आहे. तर अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या मुंबई गुन्हे शाखा 11 च्या ताब्यात आहे. अशातच आता ईडीने वाझेचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यास विरोध केला होता. न्यायालयाने वाझेचा ताबा ईडीला देण्यास नकार दिला आहे.
अँटिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेला अटक केली आहे. तो तळोजा कारागृहात होता. एक नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथील एका गुन्ह्यात त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखेने घेतला आहे. गोरेगाव येथील एका खंडणी प्रकरणात तपासणीसाठी मुंबई गुन्हे शाखा तपास करणार आहे.