मुंबई -कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंटसह सह आरोपीना आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या जेलला आर्थर रोड जेल म्हणून संबोधले जात असले तरी त्याचे खरे नाव मुंबई सेंट्रल जेल असे आहे. या जेलमध्ये विशेष न्यायालयही स्थापन करण्यात आले असून त्याकडे जाण्यासाठी २० फुटांचा बॉम्बप्रूफ बोगदाही बांधण्यात आला आहे. देशातील सर्वात जास्त गर्दी असलेल्या कारागृहांपैकी हे एक आहे.
हेही वाचा -वाचा : आर्यन खानला जामीन न मंजूर होण्याचे कारण आणि जेलमध्ये आर्यनला कशी मिळेल वागणूक?
आर्थर रोड जेल
मुंबईच्या सात रस्ता परिसरात १८४२ ते १८४६ दरम्यान मुंबईचे गव्हर्नर असलेल्या सर जॉर्ज आर्थर यांचे नाव रस्त्याला देण्यात आले. या रस्त्यावर ब्रिटिशांनी १९२५-२६मध्ये या कारागृहाची स्थापना केली. वास्तविक पाहता १९७०च्या दशकात कामगार चळवळीशी संबंधित शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते पंडित सदाशिव साने यांच्या नावावरून या रस्त्याचे नाव बदलून साने गुरुजी मार्ग असे करण्यात आले. या जेलचे अधिकृत नाव मुंबई सेंट्रल जेल असे असले तरी त्याला आर्थर रोड जेल या नावानेच ओळखले जाते. आर्थर रोड जेल हे नाव लोकप्रिय झाले असून संस्कृती, पोलीस आणि न्यायालयीन कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
केंद्रीय कारागृह म्हणून घोषित
स्वातंत्र्यपूर्व भारतातील कारागृहांवरील सर्वात प्राचीन उपलब्ध कागदपत्रांपैकी मुंबईमध्ये दोन कारागृहांचा उल्लेख आहे. त्यावेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या विभागात या दोन जेलचा समावेश आहे. एकाचे नाव बॉम्बे कॉमन जेल तर दुसऱ्याचे नाव सुधारगृह असे आहे. बॉम्बे कॉमन जेल म्हणजे आर्थर रोड जेल तर सुधारगृह हे भायखळा येथे आहे. १९१९-२०च्या भारतीय जेल समितीचा अहवालानुसार त्यावेळची सर्वात जास्त गर्दी मुंबई प्रेसिडेन्सीच्या कारागृहांमध्ये आढळली होती. त्यात बॉम्बे कॉमन कारागृहाचे वर्णन "खूप जुन्या आणि अयोग्य इमारतींचा संग्रह आहे ज्यांचा दीर्घकाळ निषेध करण्यात आला तरीही ते वापरातच आहेत." आर्थर रोड कारागृहासह नंतर आणखी कारागृहे बांधण्यात आली. १९७२मध्ये हे केंद्रीय कारागृह म्हणून घोषित करण्यात आले.