नवी मुंबई - शहरामध्ये एका नवीन लग्न जमलेल्या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलाच्या घरीच दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचे लग्न जमलेले असतानाही यांनी आत्महत्या का केली असावी यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत.
घणसोलीमध्ये सिम्लेक्स सोसायटीमध्ये दत्ता वरे हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. साक्षी गोळे या तरुणीशी त्याचे नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या कुटुंबीयांचा सुरुवातीला त्यांच्या लग्नाला विरोध होता, मात्र नंतर त्यांना घरूनदेखील पाठिंबा मिळाला. तरीही दोन्ही कुटुंबीयांमधील तणाव संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे ठरलेले लग्न मोडते की काय अशा भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.