मुंबई -विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी झालेल्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ता यांच्या डोक्यात गेली असून राज्यात अघोषित आणीबाणी आहे. महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटत आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
..त्यामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित -
ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कात्रीत पकडण्याचाही प्रयत्न या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत केला आहे. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. या विषयाबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे मंत्री आणि प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ओबीसी समाजाच्या मनात भयाचे वातावरण असून सरकारची बोटचेपी भूमिका आहे, असं म्हणत फडणवीस यांनी आरक्षणप्रश्नी सरकावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा -
कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे, ते समजत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.