मुंबई - इम्युनिटी बुस्टर, खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना मिळाल्यानंतर कोरोनाच्या औषधाची बतावणी करणाऱ्या पतंजलीला आता राजस्थान सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने देखील बंदी घातली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे. जयपूरच्या 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स'ने क्लिनिकल ट्रायल घेतली का? याची माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशमुख यांनी नकली औषधे महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही, असं स्पष्ट केलंय.
पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. याबाबत बाबा रामदेव यांनी घोषणा केली होती. परंतु, केंद्राने दिलेल्या नोटीसीनंतर आता उत्तराखंड राज्याच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. कोरोना किटसाठी कशी परवानगी मिळाली, कोणत्या आधारावर हा दावा करण्यात आलाय, अशी विचारणा पतंजलीला राज्याच्या आयुर्वेद विभागाकडून करण्यात आली आहे.
राज्याच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीला इम्युनिटी बुस्टर, खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. त्यात कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. दरम्यान , कोरोनिल औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे, असे पतंजलीतर्फे सांगण्यात आले.
70 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले असून 100 टक्के रुग्ण सात दिवसांत बरे झाल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात कोरोनाच्या औषधांसाठी संशोधन सुरू असताना रामदेवबाबांच्या दाव्यामुळे नेटिझन्स तुटून पडले होते. विविध पातळ्यांवर त्याची पोलखोल झाल्यानंतर बाबा रामदेव यांच्या औषधाला आयुष विभागाने देखील परवाना देण्यास नकार दिला. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
पतंजलीच्या औषधावर गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटनंतर आता भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राम कदमांची वादात उडी
बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल या नावाने बाजारात येणाऱ्या या औषधावरून अनेकांनी टीकाटिप्पणी केली. सर्व स्तरांतून या आयुर्वेदिक औषधावर प्रतिक्रिया उमटल्या. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे औषध बनावटी असल्याची टीका केली. पतंजलीच्या औषधावर गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटनंतर आता भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शहानिशा न करता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बनावटी म्हणणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.