मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. राज्यातही संचारबंदी आणि जमावबंदीचे काटेकोरपणे पालन होत आहे. असे असतानाही बेकायदा मद्य वाहतूक व विक्री सुरूच असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन असल्याने, या काळात मद्यसाठा वाहतूक आणि विक्रीस मनाई आहे. मात्र, तळीरामांची मागणी वाढली आहे. त्यासाठी ते वाटेल ती किंमत द्यायला तयार होत आहेत. त्यामुळेच मद्यविक्रेत्यांनी दारूचा बेकायदा पुरवठा करण्यास पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा...Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
एकीकडे महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांमध्ये दारूबंदीमुळे समुपदेशन केंद्र अथवा दारू सोडण्यासाठीचे उपक्रम राबवले जात असताना राज्यात मात्र, तळीरामांच्या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी अनेक दारू तस्कर पुढे सरसावले आहे. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक भरारी पथकांकडून सातत्याने अवैध दारूसाठे आणि विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहे. मंगळवारच्याच एका अहवालानुसार, 'संपूर्ण भारतात संचारबंदी असताना महाराष्ट्रात मंगळवारी 38 लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी एकाच दिवशी 155 गुन्हे दाखल केले असून 155 जणांना अटक केली आहे'. एकंदरीत महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात दारूचा काळाबाजार वाढला असून दारू तस्करांना अच्छे दिन येत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा...'मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे कोरोनावरील औषध नाही'
राज्यात दारुसाठी काय पण ?
महाराष्ट्रात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, तिथे दारूबंदी फसल्याचे दिसत आहे. राज्याला 17 हजार कोटींचा महसूल फक्त दारूतून मिळतो. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी की नाही, हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने अनायसे संपुर्ण राज्यात एकप्रकारे दारुबंदी असल्याचे चित्र आहे. परंतु ज्याप्रमाणे चंद्रपूरात दारुबंदीमुळे दारू माफिया निर्माण झाले, तसेच सध्या राज्यभर दारू माफिया आणि दारू तस्करांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांच्या घटनांवरुन आपल्याला राज्यातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
लॉकडाऊनमध्ये दारू तेजीत; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत साडेआठ लाखाची दारू जप्त
अहमदनगर - लॉकडाऊनमुळे दारू विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, काही ठिकाणी व्याकुळ झालेल्या मद्य शौकिनाची चोरी-छुप्या पद्धतीने देखभाल करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अहमदगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने साडे आठ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा; बारामती पोलिसांची कारवाई
पुणे -कोरोना संचारबंदीत सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. बारामती तालुक्यातील गुणवडी येथे सुरू असणाऱ्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बारामती शहर पोलिसांनी तीन लाखापेक्षा अधिक रकमेची दारू नष्ट केली.