महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचा फटका; राज्यातील पर्यटनस्थळांची काय आहे स्थिती? आढावा... - सिंधुदुर्ग पर्यटन

ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोरोनाने देशात प्रवेश केला आणि सर्वच बंद झाले. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी पर्यटकांविनाच गेली. आता दिवाळी सण सुरू झाला असून, राज्यातील अनेक पर्यटनस्थळं सध्या पर्यटकांविना ओस पडले आहेत. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग याठिकाणी अनेक पर्यटक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हे सर्वच पर्यटनस्थळे शांतच आहेत. यासंदर्भातला 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा....

corona tourism
कोरोनाचा फटका

By

Published : Nov 14, 2020, 8:19 PM IST

मुंबई - देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. याप्रमाणेच लॉकडाऊन आणि कोरोनाचा फटका हा पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोरोनाने देशात प्रवेश केला आणि सर्वच बंद झाले. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी पर्यटकांविनाच गेली. आता दिवाळी सण सुरू झाला असून, राज्यातील अनेक पर्यटनस्थळं सध्या पर्यटकांविना ओस पडले आहेत. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग याठिकाणी अनेक पर्यटक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हे सर्वच पर्यटनस्थळे शांतच आहेत. यासंदर्भातला 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा....

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पर्यटकांचे मात्र 'सोशल डिस्टनसिंग' सुरूच

मुंबई - देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्राला त्याचा चांगलाच दणका बसला आहे. एकंदरीत दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मुंबईत पर्यटकांची चांगलीच रेलचेल असते. मग प्रसिद्ध वरळी सिफेस असो की, जुहू चौपाटी मुंबई पर्यटकांचे स्वागत करण्यास तयार असते. मात्र, ह्या वर्षी कोरोना इफेक्ट सणांवर कसा आहे, तसेच 'अनलॉकिंग'नंतर कोरोनामुळे पर्यटनावर काय परिणाम झाला आहे? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केला. त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीची निवड केली.

जुहू बीचवरील ठेला चालकांची व्यथा -

जी कथा पर्यटकांची तिच कथा जुहू बीचवर छोटेखानी ठेला चालवणारे ठेलाचालकांची, कोरोनाने त्यांचे जीवन पण हैराण केले. फैयज यांचे जुहू बीचवर फास्ट फूडचे दुकान आहे. या दोन महिन्यांत ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कुटुंबात 4 लोक आहेत. गेल्या 34 वर्षांपासून हा उद्योग असाच सुरू होता. परंतु, लॉकडाउनने तो मोडला अनलॉक सुरू झाले, पण कोरोना इफेक्ट असा की सर्व सामान्य जनता अजूनही डिस्टनसिंग करत आहे. आता मुंबई अनलॉक झाली आहे, पण तरीही व्यवसाय जणू कुलूपबंद आहे. दुकान चालवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे दुकान चालवणे तोट्याचे ठरत असल्याचे फैयाज सांगतात.

कोरोनाचा विपरित परिणाम : रत्नागिरीत पर्यटकांची संख्या रोडावली

रत्नागिरी - कोरोनाचा परिणाम कोकणच्या पर्यटनावरही झालेला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायांनाही याचा फटका बसलेला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीत मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. त्यामुळे अथांग समुद्राच्या साक्षीने पर्यटक दिवाळीची सुट्टी एन्जॉय करतात. दिवाळीत इथले हॉटेल, लॉज फुल्ल असतात. यावर्षी मात्र वेगळे चित्र आहे. इथल्या व्यवसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे. कारण सध्या 10 टक्के सुद्धा बुकिंग नसल्याची माहिती स्थानिक व्यवसायिक देत आहेत.

अथांग कोकण

कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळेच कोकण आणि कोकणाचा अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचे आकर्षण असते. त्यामुळेच नववर्ष स्वागत असो, मे महिन्याची सुट्टी असो किंवा दिवाळीची सुट्टी असो, पर्टकांची सर्वाधिक पसंती असते ती कोकणच्या किनारपट्टीला. आंजर्ले, केळशी, कर्दे, लाडघर, गुहागर, मुरुड, गणपतीपुळे, रत्नागिरी, तारकर्ली, मालवण अशा सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर लाखो पर्यटकांची गर्दी या सुट्ट्यांमध्ये असते. त्यामुळे कोकणचे किनारे पर्यटकांनी नेहमीच गजबजून गेलेले असायचे.

यंदा मात्र प्रतीक्षा

दिवाळीची सुट्टी कोकणात घालविण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक अगोदर बुकिंग करत असतात. त्यामुळे दरवर्षी हॉटेल्स, लॉज, एमटीडीसी रिसॉर्ट सर्वच 100 टक्के फुल्ल असते. त्यामुळे अनेकांना तर रूमही मिळत नाही. यावर्षी मात्र, कोरोनाचा मोठा परिणाम इथल्या पर्यटनावर झालेला आहे. कोरोनामुळे काही निर्बंध आले आहेत. त्यातच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे यावर्षी उन्हाळी सुट्टीचा हंगामही वाया गेला. त्यानंतर दिवाळीतही हीच स्थिती राहणार, अशी शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीत फुल्ल असणाऱ्या हॉटेल्सचे बुकिंग यावर्षी 10 टक्केही नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

गणपतीपुळेच्या भक्तनिवासाचेही बुकिंग नाही

याबाबत गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले की, कोरोनामुळे बंद असलेले गणपती देवस्थानचे भक्त निवास 1 नोव्हेंबरपासून सुरू झाले. दरवर्षी दिवाळीत भक्तनिवास अगदी 100 टक्के फुल्ल असतो. पण गेल्या आठवड्यातील शनिवार- रविवारी पाच सुद्धा खोल्या गेलेल्या नाहीत. लक्ष्मीपूजनांतर तरी पर्यटक येतील असा आशावाद डॉ. भिडे यांनी व्यक्त केला.

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांकडेही पाठ

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे पर्यटक निवास भरले होते. मॅनेजर कोट्यातील ज्या रूम होत्या, त्या देखील भरल्या होत्या. यावर्षी मात्र कोरोनाच्या फटक्यामुळे एमटीडीसी पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी असल्याचे एमटीडीसीच्या कोकण विभागाचे रिजनल टुरिझम ऑफिसर दीपक माने यांनी सांगितले. त्यामुळे एकूणच यावर्षी कोरोनाचा फटका दिवाळीतल्या कोकणातील पर्यटनाला बसल्याचे दिसत आहे.

रायगड; लॉजिग, रिसॉर्टमध्ये 20 ते 30 टक्केच बुकिंग

रायगड - शासनाने टाळेबंदी शिथिल केली आणि पर्यटनही खुले केले. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दिवाळी हा सण लॉजिग, रिसॉर्ट, हॉटेल व्यवसायिक याचा कमाईचा असतो. दिवाळीत लॉजिग व्यवसायिकांना महिनाभर आधीच बुकिंग मिळत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे व्यवसायिक हे पर्यटकांची वाट पाहू लागले आहेत. त्यामुळे यावेळी लॉजिग, हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिकांना 20 ते 30 टक्केच बुकिंग मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, किहीम, मांडवा, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन हे समुद्र किनारे आहेत. याठिकाणी पर्यटक हे मोठ्या संख्येने मौजमजा करण्यास येत असतात. पर्यटक हे वन-डे पिकनिक करून पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे वस्तीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. पर्यटक नसल्याने लॉजिग रिसॉर्ट व्यावसायिक हे चिंतेत सापडले आहेत. दिवाळीच्या सुटीत पर्यटक हे मोठ्या संख्येने येईल, अशी आशा बाळगून असणाऱ्या व्यवसायिकांनी कोरोना अनुषंगाने लॉज, रिसॉर्टच्या रूम या सॅनिटाईज केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळले जात आहेत. त्यामुळे सॅनिटाईज करून झालेला खर्च तरी निघणार की नाही, हा प्रश्न व्यवसायिकांना पडला आहे.

ऐतिहासिक वास्तू पर्यटकांसाठी खुल्या

पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या छोट्या व्यवसायिकांनाही दिवाळीत फटका बसला आहे. तसेच ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तु पर्यटकांसाठी खुलेशासनाने समुद्रकिनारी पर्यटन सुरू केले असले, तरी ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तू यांच्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे शिवप्रेमी, ट्रेकिंग, सामाजिक संस्थांनी गड, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गड, किल्ले ऐतिहासिक वास्तू हे कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना खुले केले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला आता चालना मिळणार आहे.

सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला कोरोनाचा फटका

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण किल्ला हे पर्यटकांचे माहेरघर. दरवर्षी या किल्ल्याला दिवाळीच्या सुट्टीत साधारण 1 लाख पर्यटक भेट देत असतात. यावर्षी ही संख्या10 टक्के एवढी देखील नाही. मात्र, या किल्ल्यावर सध्या पुरेशी काळजी घेऊनच पर्यटकांना सोडले जात आहे. मालवण किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून बोट सेवा चालवली जाते. या बोट सेवेच्या बुकिंग केंद्रात काम करणाऱ्या कामगारांनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची संख्या घटली आहे. शिवाय नियम आणि अटी लादून शासनाने ही सेवा सुरू करायला परवानगी दिली आहे. पूर्वी आम्ही एका बोटीतून 25 पर्यटक नेत होतो. आता 11 ते 12 पर्यटक न्यावे लागतात. बोट वाहतूक करणाऱ्यांना ते परवडत नाही. बोट व्यवासायिक सांगतात.

3 हजार रूम आहेत. मात्र, त्यापैकी 10 टक्केच बुक झाले-

याठिकाणी पर्यटकांची काळजी घेतली जाते. मात्र, पर्यटकच कमी आहेत. आम्हाला मागच्यावेळी किल्ल्यावर नेताना मोठ्या संख्येने हे लोक घेऊन गेले होते. मात्र, आता फॅमिली घेऊन जातात. पर्यटकांची या ठिकाणी काळजी घेतली जात असल्याचे पर्यटक मुझेफा बोरा यांनी सांगितले. तसेच आमचा मे महिन्याचा हंगाम गेला आणि आता पर्यटक येतील असे वाटत होते. मात्र, 10 टक्केच पर्यटक आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे बुकिंग आहे. परंतु ते पुढच्या दिवसांसाठी आहे. दिवाळी हंगाम मात्र आमचा फुकट गेला आहे. मालवणमध्ये साधारण 10 हजार पर्यटक राहू शकतील, असे 3 हजार रूम आहेत. मात्र, त्यापैकी 10 टक्केच बुक झाले असल्याचे व्यापारी पथसंस्थेचे चेअरमन आणि व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले. दरम्यान कोरोनाचा काळ हा सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत कठीण गेला आहे. दिवाळीत व्यावसायिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती देखील फोल ठरली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत.

यासंबंधीच्या सर्व बातम्या वाचा येथे -

ABOUT THE AUTHOR

...view details