मुंबई -कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आली. मुख्यमंत्री आणि महापालिकेच्या आवाहनाला साद देत, कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी कोरोना योध्ये पुढे आले. आज त्याच कोरोना योद्ध्यांना कामावरून काढण्यात आले आहे. तर अनेकांना कामावरून काढण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनांप्रमाणे मुंबईकर कुटुंबाची जबाबदारी आम्ही उचलली. आज आम्हाला कामावरून काढले जात असल्याने आता आमच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेने उचलावी, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी केले आहे.
मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने जम्बो कोरोना सेंटर उभारली. या कोविड सेंटरमध्ये काम करण्यास डॉक्टर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री, मुंबई महापालिकेने कोरोना योद्ध्यांनी पुढे येऊन रुग्णांची सेवा करावी, असे आवाहन केले. या आवाहनानुसार हजारो लोक कोरोना सेंटरमध्ये काम करण्यासाठी पुढे आले. या कोरोना योद्ध्यांनी रुग्णांना औषध देणे, रुग्णांना उचलणे, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिक्स लोकांना त्यांच्या घरातून उचलून कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करणे, आदी कामे केली.
कोरोनायोद्ध्यांच्याव्यथा -
रुग्णाची सेवा करताना त्यांनाही कोरोनाची लागण झाली. पगार वेळेत मिळत नसतानाही त्यांनी काम केले. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्याने कोरोना योद्ध्यांना कामावरून काढले जात आहे. आमच्या संपर्कात असलेल्या एक हजार कर्मचाऱ्यांपैकी दिडशेहून अधिक लोकांना कामावरून काढण्यात आले आहे. अनेकांना कामावर येऊ नका अशा नोटीस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रमोद काटे यांनी दिली.