मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे मुंबई आणि मुंबई परिसरात 12 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनाबाबतच्या चाचण्या याच रुग्णालयात सुरू आहेत. यामुळे रुग्णालयात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत.
चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला. काही दिवसातच हा व्हायरस जगभरात पसरला आहे. या व्हायरसने आतापर्यंत जगभरात हजारो लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसचे भारतातही रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात या व्हायरसचे 37 रुग्ण आढळले असून त्यापैकी मुंबई आणि मुंबई परिसरातील 12 रुग्ण आहेत. मुंबई आणि परिसरात कोरोनाचे व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाची भीती नागरिकांमध्ये पसरली असल्याने आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे का, हे तपासून घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात लांबलचक रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोनासंदर्भात चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात येत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या गेटपासून कोरोनाची चाचणी केली जात असलेल्या ओपीडीपर्यंत जागोजागी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर -
कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाबत ओपीडी सेवा सुरू आहे. त्यात दिवसाला ३५० लोक तपासणीसाठी येत आहेत. कस्तुरबा रुग्णालयात सध्या दिवसाला १०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. यामुळे चाचण्या करण्यासाठी नवीन चाचणी मशीन घेतल्या जात आहेत. त्या बुधवार पासून कार्यरत होतील. त्यामुळे कस्तुरबामध्ये आता होणाऱ्या १०० चाचण्यांची संख्या वाढून ३०० पर्यंत होणार आहेत. तर, पालिकेच्या केईएम रुग्णालयातही कोरोनाच्या चाचणीसाठी लॅब सुरु केली जाणार असून त्याठिकाणीही दिवसाला २५० चाचण्या केल्या जातील. यामुळे कस्तुरबा रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार आहे.