मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवार) मुंबई शहर व उपनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूरमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी होत असून आज (शनिवार) सकाळपासूनच मुंबईतील रस्त्यावर बस, रिक्षा याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले. तसेच 24 तास धावणारी मुंबई ठप्प होताना दिसत आहे. घाटकोपर पश्चिमेकडील महात्मा गांधी रोडवर फेरीवाले मोठ्या संख्येने बसतात, तिथेही बंदीमुळे शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहे.
#LOCK'डाऊन : घाटकोपरमधील महात्मा गांधी रोडवर सक्तीच्या बंदीने शुकशुकाट
कोरोना विषाणूचा राज्यात विळखा वाढत असून राज्य सरकारकडून याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई शहर व उपनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूरमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले होते
हेही वाचा...मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या ठिकाणी कोरोना विषाणूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने सक्तीच्या बंदीला शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरुवात केल्याने शनिवारी मुंबईकरांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. चारही शहरांमध्ये अन्नधान्य, दूध ,औषधे यांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही बाहेर फिरायला जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे. मुंबईतील लोकल रेल्वे आणि बस या शहराच्या जीवनवाहिन्या असल्याने त्या बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, लोकल व बस यांची संख्याही नगण्य असल्याचे दिसत होते.