मुंबई- धारावीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सायन रुग्णालयात संबंधित व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं.
23 मार्चला सर्दी-तापाची लक्षणे दिसल्याने त्यांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 26 मार्चला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. 1 एप्रिलला संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काही वेळापूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीला कोणतीही प्रवासाची पार्श्वभूमी नसल्याने आता सर्व शक्यता पडताळण्यात येत आहेत.
त्याचे गारमेंटचे दुकान आहे. हा रुग्ण राहत असलेली इमारत सील करण्यात आली असून त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना तसेच सर्व कुटूंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर इमारतीमधील अन्य रहिवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून उद्या रिपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. वृद्ध आणि आजारी लोकांची काळजी घेतली जात असून इमारतीमधील रहिवाशांना पालिकेकडून अन्न धान्य पुरवण्यात येत आहे. तसेच सर्व सहिवाशांचे रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांना इमारतीतून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवसात कोरोनाचे 116 रुग्ण वाढल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये आज दुपारनंतर 16 नवीन रुग्णांची वाढ झालीय. यामधील एक रुग्ण धारावीतील असल्याचे निष्पन्न झाले होते. याचप्रमाणे वरळी आणि लालबाग या वर्दळीच्या परिसरातदेखील कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे आता सरकारच्या चिंतेत भर पडलीय. धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यास मोठे आव्हान शासकीय यंत्रणेसमोर आहे. यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 336 वर पोहोचलाय. त्यापैकी 41 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 17 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.