महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक : मलनिःसारण वाहिन्यातील पाण्यात कोरोना व्हायरस, आयसीएमआरचा अहवाल; मुंबईकरांना धोका नाही - मुंबई करोना अपडेटस

मुंबईमध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमधील मलनिःसारणाच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. आयसीएमआरने मुंबईमध्ये सहा ठिकाणावरून नमुने गोळा केले होते. त्या सर्वच नमुन्यामध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे.

Corona virus in sewage wate
मलनिःसारण वाहिन्यातील पाण्यात कोरोना व्हायरस

By

Published : Dec 15, 2020, 6:30 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमधील मलनिःसारणाच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. आयसीएमआरने मुंबईमध्ये सहा ठिकाणावरून नमुने गोळा केले होते. त्या सर्वच नमुन्यामध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे. मात्र पालिकेकडून मलनिःसारण वाहिनीच्या पाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाते त्यामुळे मुंबईकरांना धोका नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरचा सर्व्हे

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्व्हे करून त्याठिकाणच्या मलनिःसारण वाहिनीच्या पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यात १६ मार्चच्या आधी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र ११ ते १६ मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

का करण्यात आला सर्व्हे?

कोरोना हा विषाणू नवीन असल्याने त्यावर सर्वप्रकारे अभ्यास केला जात आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांना याची लागण झाली आहे, त्यांच्या मलातून हा व्हायरस मलनिःसारण वाहिनीत जाऊ शकतो, मलनिःसारण वाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी आत उतरणाऱ्या कामगाराला त्यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आयसीएमआरने याबाबत अभ्यास सुरु केला होता. या अभ्यासातून मलनिःसारण वाहिन्यांमध्येही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो हे समोर आले आहे.

मुंबईकरांना धोका नाही

सहा ठिकाणी घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असा अहवाल आमच्यापर्यंत अद्याप आलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून मलनिःसारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया केली जाते. आणि त्यानंतरच हे पाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा मुंबईकरांशी थेट संबंध येत नसल्याने यामुळे मुंबईकरांना याचा धोका नाही. मलनिःस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात. यामुळे भीतीचे कारण नसल्याचे एका पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details