महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोना लसीकरणाचा सराव यशस्वी; वेध प्रत्यक्ष लसीकरणाचे

आज मुंबईतील कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रामध्ये आज लशीची सराव फेरी यशस्वी पार पडली. त्यामुळे आता लस उपलब्ध झाल्यास प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहेत, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. लसीकरणाचा सराव यशस्वी झाल्याने मुंबईकरांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्षातील लसीकरणाचे.

मुंबई
मुंबई

By

Published : Jan 8, 2021, 3:22 PM IST

मुंबई- कोरोनाविरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आज मुंबईतील कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रामध्ये आज लशीची सराव फेरी यशस्वी पार पडली. त्यामुळे आता लस उपलब्ध झाल्यास प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहेत, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. लसीकरणाचा सराव यशस्वी झाल्याने मुंबईकरांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्षातील लसीकरणाचे. त्यानुसार लवकरच लसीकरणाची तारीख जाहीर होईल आणि सराव फेरीप्रमाणेच लसीकरण यशस्वी करत कोरोनाला आपण हरवू, असा विश्वास यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

मुंबई

सकाळपासूनच सुरू होती जय्यत तयारी
प्रत्येक मुंबईकरापर्यंत लस पोहचावी यासाठी पालिकेने 8 मुख्य लसीकरण केंद्र तयार केली आहेत. तर सहा कोविड केंद्रांमध्येही लसीकरण केंद्राची निर्मिती केली आहे. पुढे गरजेनुसार शाळा, महाविद्यालये, जिमखाने वा इतर क्वारंटाइन केंद्रांमध्येही अशी केंद्र तयार करण्याची पालिकेची तयारी आहे. लसीकरण सुरू झाल्यास प्रतिदिन 12 हजार लसी प्रमाणे सुरुवात करत पुढे हा आकडा प्रतिदिन 50 हजार, असा केला जाणार आहे. दरम्यान, आज राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत कूपर, राजावाडी आणि बीकेसी येथे लशीची सरवा फेरी पार पडली. लसीकरणाचा सराव आज होणार असल्याने तिन्ही केंद्रावर सकाळपासून जय्यत तयारी सुरू होती. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे नियोजन करत हा सराव यशस्वी केला.
प्रत्येकाने लस घ्यावी - महापौर
बीकेसी कोविड केंद्रामधील सराव लसीकरणाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. यावेळी मुंबईत लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी कशी पूर्ण करण्यात आली आहे? तर लसीकरण कसे केले जाणार आहे? याची माहिती त्यांनी दिली. तर लवकरच लसीकरणाची तारीख जाहीर होईल, असे सांगतानाच आजचा लसीकरणाचा सराव दिवस कोरोना विरोधातील लढ्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे, असे म्हणत कोरोना योध्यांचे कौतुक केले. तसेच लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही लस पुढे घ्यावी. जेणेकरून कोरोनाशी आपण 'फाईट' करत आहोत, तेव्हा पुढे कोरोनाच काय कुठल्याही विषाणूने आपल्याला 'बाईट' करू नये, असेही त्या यावेळी म्हणाल्या. एकूणच आता मुंबईला प्रत्यक्ष लस कधी उपलब्ध होते, कधी लस देण्यास सुरुवात होते आणि मागील 10 महिन्यापासून जे संकट घेऊन मुंबईकर, देश जगत आहे ते संकट कधी एकदाचे दूर होते, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details