मुंबई -शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीने व्हावे यासाठी पालिकेने महाविद्यालयांमध्ये लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह सुरू केला आहे. आज घाटकोपर येथील के.जे. सोमैया या महाविद्यालयामध्ये पालिकेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा -मंत्रालयातील इंटरनेट सेवा खंडित
राज्यातील विविध विद्यापीठे, त्याअंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ ते २५ वर्षे वयोगटांतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने 'मिशन युवा स्वास्थ्य' या मोहिमेची सुरुवात केली आहे. काल मुंबईतील ३२ कॉलेजमध्ये पार पडलेल्या मोहिमेत 3 हजार 920 विद्यार्थ्यांनी लस घेतली. विद्याविहार येथील सोमैया महाविद्यालयात या मोहिमेची आजपासून सुरुवात झाली आहे. आज या महाविद्यालयामध्ये 700 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याबरोबरच उद्या देखील सातशे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष कॉलेज सुरू करताना ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत, त्याच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता येणार आहे. यामुळे केवळ लस घेतली नाही म्हणून प्रत्यक्ष कॉलेजला येता आले नाही, असे होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचे असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.