मुंबई - शहरात कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेकडून अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या 'सुपर स्प्रेडर्स'ची कोरोना चाचणी केली जात आहे. मागील पाच दिवसात तब्बल १५० सुपर स्प्रेडर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. यासाठी पालिकेने सुपर स्प्रेडरची शोधमोहीम सुरू केली आहे.
सुपर स्प्रेडरच्या चाचण्या
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविडबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तरीही रुग्णसंख्या वाढू नये व कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांशी अधिक संपर्क येणा-या व्यवसायिकांची कोविड चाचणी करण्यासाठी मनपाने विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत विविध दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक इत्यादींच्या कोविड चाचण्या नियमितपणे सुरू आहेत. यामध्ये बाधित रुग्ण आढळल्यास तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. तसेच या रुग्णांचे विलगीकरण, समुपदेशन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
१५० सुपर स्प्रेडर कोरोना पॉझिटिव्ह
याच अनुषंगाने गेल्या पाच दिवसांत मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये सुमारे १२ हजार दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची अँटिजन चाचणी घेण्यात आली. त्यापैकी सुमारे १५० जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या विक्रेत्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याने त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. यामुळे एकूण १२ हजार चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी सुमारे तीन हजार संभाव्य स्प्रेडर्सची चौकशी सुरू आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका जोरात कामाला लागली आहे.
मोफत वैद्यकीय चाचणी
मुंबईत रोज १८ ते १९ हजार लोकांची आरटीपीसीआर आणि जलद चाचणी घेण्यात येत आहे. नागरिकांना कोविडची कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्यांनी तातडीने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याचे आवाहन पावलिकेने केले आहे. यासाठी महापालिकेच्या अखत्यारितील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.