मुंबई - शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रसार होत असताना त्याला रोखण्यासाठी झोपडपट्टीतील नागरिक नियमांचे पालन करत होते. त्याच वेळी उंच इमारतीमधील नागरिक नियमांचे उल्लंघन करत होते. उंच इमारतीमधील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. इमारतीमधील नागरिकांनी झोपडपट्टीतील नागरिकांकडून शिकण्याची गरज असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे.
मुंबईमध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात मी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्याला रोखण्याचे मोठे आव्हान होते. मात्र झोपडपट्टीमधील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपले दरवाजे उघडून स्वागत केले. त्यांनी नियमांचे पालन केले त्यामुळे झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रसार रोखता आल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासाठी मी झोपडपट्टीमधील नागरिकांचे अभिनंदन करतो, असे आयुक्त म्हणाले.
हेही वाचा -जगभरात 6 लाख 88 हजार 962 कोरोना रुग्णांचा मृत्यू
मुंबईमध्ये सध्या दररोज 1,100 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी 80 टक्के रुग्ण उंच इमारतीमधील आहेत. उंच इमारतीमधील नागरिक बेशिस्तपणे वागत असल्याने कोरोनाचा रुग्ण जास्त प्रमाणात इमारतींमधून आढळून येत आहेत. इमारतीमधील नागरिकांनी झोपडपट्टीतील नागरिकांकडून काही शिकावे, असा सल्ला आयुक्तांनी दिला आहे. कमित कमी आपल्या कुटूंबासाठी इमारतीमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
...तर मुंबई पुन्हा धावणार
मुंबईची लोकसंख्या 2 कोटीच्या जवळपास आहे. सध्या रोज 1100 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यानुसार आम्ही मुंबईचे जनजीवन पुन्हा सुरू करू शकतो. मात्र मुंबईला लागून असलेल्या महापालिका आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी मुंबई लगतच्या पालिका आणि जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाल्यावर मुंबईमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.