महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला दिवस; राज्यात १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण

आजपासून मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 1926 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे.

लस
लस

By

Published : Jan 16, 2021, 9:42 PM IST

मुंबई -देशासह राज्यात आजपासून (शनिवार) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. ही लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली. राज्यात आज १८ हजार कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ

आजपासून मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 1926 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. मुंबईत आज सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात 500 पैकी 150 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना लस दिली, त्यापैकी कोणावरही दुष्परिणाम झाला नसल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

राज्यातील विविध शहरांमध्ये लसीकरण

पश्चिम महाराष्ट्रातदेखील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आली. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देण्यात आली. कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात आली. कोल्हापुरातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान आरोग्य कर्मचारी अक्षता माने यांना मिळाला आहे. नेमक्या वाढदिनी त्यांना लस मिळाल्याने सरकारकडून ही भेट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसभरात जिल्ह्यात अकराशे जणांना ही लस देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पवन साळवी यांनी प्रथम लस टोचवून घेतली. सोलापूर, सातारा, सांगलीत आजपासून कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे.

विदर्भासह मराठवाड्यात लसीकरण

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर नागपुरातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. नागपूरच्या पचपावली परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या स्त्री रुग्णालयात(सुतीका गृह) पहिली लस टोचण्यात आली. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आणि शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर दया शंकर तिवारी यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. डॉ. आशिष गीरे हे अकोल्यातील पहिले पुरुष लस घेणारे व्यक्ती ठरले आहेत. तर डॉ. विजया पवनीकर या लस घेणारे पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण उपक्रमाला सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. बीड जिल्ह्यात एकूण 500 डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना 5 केंद्रावरून कोरोना लसीकरण झाले. या पाच केंद्रामध्ये बीड जिल्हा रुग्णालयसह गेवराई, आष्टी, अंबाजोगाई व परळी तालुक्याचा समावेश आहे. लसीकरण दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात लसीकरण मोहिमेला बीड जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. अख्तर मुबारक शेख या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली लस टोचण्यात आली.

नंदुरबारचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी निलीमा वळवी यांनी पहिली लस घेतली. नाशिक जिल्ह्यात कोविड लसीकरणाला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थिती सुरुवात झाली. जिल्ह्यातील 13 केंद्राच्या माध्यमातून पहिल्या दिवशी 1300 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. अहमदनगर महानगरपालिका आरोग्य केंद्र तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. नगर जिल्ह्यात 12 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात शनिवारी सकाळी 11च्या सुमारास बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पहिली लस टोचून घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेचे ते जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले. त्यांच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी लस घेतली.

औरंगाबादमधील शिरोमणी गुरू आरोग्य केंद्र येथून कोवीड लसीकरणाला सुरुवात झाली. शहरातील एका केंद्रावर १०० जणांना लस दिली. आज ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली. आज सकाळी अकरा वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातील पाच केंद्रावर लसीकरण मोहीम असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी निता पाडळकर यांनी दिली.

कोकण विभागात लसीकरणाला प्रारंभ

रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्रांच्या माध्यमातून 400 आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली आहे. 8 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात ही लस दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरीसह उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी येथे या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० या प्रमाणे ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात पहिल्या लाभार्थी अलका सांगवेकर यांना तर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात पहिले लाभार्थी मनोहर परब याना लस देण्यात आली. तर दुसरीकडे रत्नागिरीतही आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा -हरयाणात १८ कोरोना योद्ध्यांचा लस घेण्यास नकार, कारण...

हेही वाचा -सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी घेतली लस

ABOUT THE AUTHOR

...view details