मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णालयांवर रुग्णांच्या संख्येमुळे मोठा ताण पाहायला मिळतोय. मात्र अशा कठीण परिस्थितीतही रुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्याचं काम सुरू आहे. पण काही रुग्णालयांमध्ये व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी समोर येत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडर, औषध यांचा काळाबाजार तर अनेकवेळा रुग्णांना त्यांचे रिपोर्ट चुकीचे दिले जात आल्याच समोर आलंय. अशी परिस्थिती अनेक रुग्णालयांमध्ये पाहायला मिळतेय.
एकाच दिवशी कोरोनाचे दोन वेगवेगळे रिपोर्ट-
तसेच मुंबईमधील जेजे रुग्णालयाने तर अव्यवस्थेचा कळसच गाठला आहे. एकाच दिवशी रुग्णाला कोरोनाचे दोन वेगवेगळे रिपोर्ट देण्यात आले आहेत. हे रिपोर्ट हाती आल्यानंतर नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
बदलापूरच्या सुवर्णा पेटकर यांच्या पायाला गॅंगरीन झाल्यामुळे त्या उपचारासाठी जे जे रुग्णालय मध्ये दाखल झाल्या होत्या. तिथे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 9 एप्रिलला त्यांची पहिली टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे हा रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र काही वेळेनंतर पुन्हा एकदा त्यांची टेस्ट करण्यात आली. मात्र ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे काहीच वेळानंतर केलेल्या या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह कशी, आली असा प्रश्न आता नातेवाईक विचारत आहेत.