मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असतानाच मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा गुणाकार काहीसा आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईमधील 24 पैकी 8 वॉर्डमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांहून अधिक झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 24 वॉर्डपैकी 8 वॉर्डमधील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 105 ते 145 दिवसांचा झाला आहे. यात एच पूर्व वांद्रे हा वॉर्ड आघाडीवर आहे. वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ असा हा विभाग कोरोना नियंत्रणात, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत सुरुवातीपासून जूनपासून आघाडीवर आहे. आजच्या दिवशी या वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 145 दिवस आहे. येथे दररोज 12 ते 27 कोरोनाबाधित आढळतात. एच पूर्वनंतर के ईस्ट (अंधेरी पूर्व) मध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 133 दिवस आहे. येथे दरोरोज 30 ते 50 कोरोनाबाधित आढळतात. तिसऱ्या क्रमांकावर एल वॉर्ड
(कुर्ला) आहे. या वॉर्डमध्ये 122 दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. येथेही रोज सुमारे 30 ते 50 कोरोनाचे पॉझिटिव्ह व्यक्ती आढळतात.
एस विभाग अर्थात भांडूपचामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा दर 116 दिवस इतका आहे. येथे दररोज 30 ते 55 च्या दरम्यान कोरोनाबाधित आढळत आहेत. एस वॉर्डनंतर चेंबूर एम पूर्व विभागात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 113 दिवस आहे. येथे रोज 20 ते 50 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळतात. या पाठोपाठ के वेस्ट अर्थात अंधेरी पश्चिम विभागाचा कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 109 इतका आहे. येथे 20 ते 65 च्या दरम्यान रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.