मुंबई - शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १५७ दिवसांवर पोहोचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. १ ऑक्टोबर रोजी हा वेग ६६ दिवस होता. ३० ऑक्टोबरला नोंद केल्यानंतर हा कालावधी ९१ दिवसांनी वाढल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मिशन झिरो, माझे कुटुंब माझी जबाबदारी, चेस द व्हायरस, डॉक्टर आपल्या दारी, ट्रेसिंग ट्रॅकिंग ट्रीटमेंट या योजना राबवल्या. याचा परिणाम म्हणून जुलैपर्यंत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात धार्मिक सणांदरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने पुन्हा सप्टेंबरमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली. आरोग्य विभागाने आपल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने गेल्या ३० दिवसांतच रुग्ण दुप्पटीचा कालावधी ९१ दिवसांनी वाढला आहे. १ ऑक्टोबरला ६६ दिवसांवर घसरलेला रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३० ऑक्टोबरला १५७ दिवसांवर पोहोचला आहे.
असा वाढला कालावधी
१५ सप्टेंबरला रुग्ण दुप्पटीचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचला आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली. परंतु मिशन झिरो, माझे कुटुंब माझी जबाबदारी, चेस द व्हायरस, डॉक्टर आपल्या दारी, ट्रेसिंग ट्रॅकिंग ट्रीटमेंट या योजना राबविण्यात आल्या. त्याचा परिणाम लवकरच दिसू लागला. ३० सप्टेंबरला रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६६ दिवसांवर येऊन पोहोचला. १ ऑक्टोबरला ६६ दिवसांवर आलेला रुग्ण दुप्पटीचा कालावधी २९ ऑक्टोबरला १४९ दिवसांवर तर ३० ऑक्टोबरला हा कालावधी १५७ दिवसांवर पोहचला आहे. यामुळे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
२९ दिवसांत साडेतीन लाख चाचण्या
कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली. जून अखेरपर्यंत रोज १० ते १४ हजार चाचण्या रोज होत असे. आता रोज २० हजारांच्या घरात चाचण्या करण्यात येत आहेत. १ ऑक्टोबरला ११ लाख २९ हजार ८६९ चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. त्याच चाचण्यांची क्षमता वाढवत २९ ऑक्टोबरला १४ लाख ९८ हजार ५९८ चाचण्या करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 10 दिवसांत 100 दिवसांवरून 150 पार
मुंबईत केवळ 10 दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 57 दिवसांनी वाढून 100 दिवसांवरून 157 दिवसांवर पोहोचला आहे. 20 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचा 100 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.
एफ दक्षिण विभाग रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचा 200 दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला होता. तो लौकिक कायम ठेवत या विभागाने 300 दिवसांचाही टप्पा ओलांडला असून आता कालावधी 362 दिवसांवर पोहोचला आहे. या पाठोपाठ बी ,जी दक्षिण, ए विभागांनीही 200 दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या बी विभाग 232 दिवस, जी-दक्षिण 231 दिवस, ए विभागात 212 दिवस इतका रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे.