मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. दुसरी लाट ओसरत असल्याने मुंबईमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे कंटेनमेंट झोन, सील इमारतींची संख्या कमी होत आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागापैकी २० विभागात एकही झोपडपट्टी तसेच ९ विभागात एकही इमारत सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यामुळे मुंबईमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत आहे, असे दिसत आहे.
२० विभागात झोपडपट्ट्या सील नाहीत -
मुंबई महापालिकेची २४ विभाग कार्यालय आहेत. या कार्यालयांमधून पालिकेचे कामकाज केले जाते. या विभाग कार्यालयांपैकी २० विभागात एकही झोपडपट्टी किंवा चाळ सील नाही. अंधेरी येथील के ईस्ट मध्ये ४, भांडुप येथील एस, कांदिवली येथील आर साऊथ तसेच मानखुर्द गोवंडी येथील एम ईस्ट विभागात प्रत्येकी दोन झोपडपट्या आणि चाळी सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत १० चाळी कंटेनमेंट झोन आहेत. त्यात १३ हजार घरे असून त्यात ५७ हजार नागरिक राहतात.
९ विभागात इमारती सील नाहीत -
महापालिकेच्या २४ पैकी ९ विभागात एकही इमारत सील नाही. मुलुंडच्या टी, कांदिवली येथील आर साऊथ, बोरिवली येथील आर सेंट्रल, कुर्ला येथील एल, अंधेरी पूर्व येथील के ईस्ट, बांद्रा येथील एच वेस्ट, खार येथील एच ईस्ट, एल्फिस्टन येथील जी साऊथ तसेच फोर्ट कुलाबा येथील ए या विभागात एकही इमारत सील नाही. दहिसर येथील आर नॉर्थ, गोरेगाव येथील पी साऊथ, घाटकोपर येथील एन, दादर येथील जी नॉर्थ, मारिन लाईन्स येथील सी तसेच सँडहर्स्ट रोड येथील बी वॉर्डमध्ये प्रत्येकी एक इमारत सील आहे. सर्वाधिक ३४ इमारती या अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट विभागात सील आहेत. मुंबईत सध्या ७९ इमारती सील असून त्यात ५ हजार घरे आहेत. त्यात १९ हजार नागरिक राहत आहेत.
२ हजार १६८ माजले सील -
मुंबईत २ हजार १६८ माजले सील आहेत. त्यात ८२ हजार घरे असून त्यात ३ लाख १२ हजार नागरिक राहात आहेत. कुर्ला येथील एल तसेच खार एच ईस्ट विभागात एकही मजला सील नाही. तर अंधेरी पश्चिम के वेस्ट विभागात ३२५, कांदिवली आर साऊथ विभागात २७२, अंधेरी पूर्व येथील के वेस्ट विभागात २६०, मालाड पी नॉर्थ विभागात २०२, मुलुंडच्या टी विभागात १९४, बोरिवली आर सेंट्रल विभागात १६०, चेंबूर येथील एम वेस्ट विभागात १२५ तर ग्रांट रोड येथील डी विभागात १३० मजले सील आहेत.
का केल्या जातात सील इमारती -
मुंबईत ज्या इमारतीमध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळळून येतात त्या इमारती सील केल्या जातात. ज्या इमारतीमध्ये एकाच मजल्यावर २ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात ते मजले सील केले जातात. तर ज्या झोपडपट्ट्या आणि चाळीत कोरोना रुग्ण आढळून येतो त्याठिकाणी दाटीवाटीने लोक राहत असल्याने त्या झोपडपट्ट्या चाळी सील केल्या जातात. तेथील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी घातली जाते.
७८४ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत -
मुंबईमध्ये २० मार्च २०२० पासून २८ जून २०२१ पर्यंत ७ लाख २० हजार ९६४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६ लाख ९४ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १५ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८ हजार ४५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये ३ हजार ६४० रुग्ण लक्षणे नसलेले तर ४ हजार २९ रुग्ण लक्षणे असलेले आहेत. तसेच ७८४ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत.
कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्याशी पालिकेचे आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांची माहिती घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आहेत. रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई कर्णयचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.